गिरे तो भी टांग उपर

eknath-khadse1
भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरले गेल्यानंतर मंत्रिपदावरून पायउतार होणे भाग पडलेले एकनाथ खडसे हे राजीनामा दिल्यापासून स्वत: शांत असले तरी त्यांचे आपल्या कार्यकर्त्यांच्या (?) माध्यमातून आणि सोशल मीडियावर कार्यरत असलेल्या काही वाचाळवीरांच्या माध्यमातून पक्षावर, विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर डागण्या डागण्याचे काम सुरूच आहे. एवढे सगळे होऊन गेल्यानंतरही खडसे यांची ही कृत्य म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ असेच आहे.

आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद अब्राहीमशी संबंध, स्वीय सहाय्यकाची लाचखोरी, भोसरीतील औद्योगिक विकास महामंडळाची जमीन लाटण्याचे प्रयत्न असे गंभीर आरोप झाल्यानंतर त्याची दखल घेणे ‘खाऊंगा नही और खाने भी नही दूंगा’ असे म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांना भाग पडले आणि खडसे यांना मंत्रिपद सोडावे लागले.

राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खडसे यांची पाठराखण करणे न सोडता ‘नैतिक मूल्य’ राखण्यासाठी खडसे यांनी स्वत:हून राजीनामा दिल्याचे जाहीर केले. खडसे यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांचा यावेळी पुन्हा इन्कार केला आणि यावर प्रश्नोत्तरे होणार नाहीत; असेही आपल्या शैलीत ‘खडसावले’.

या राजीनाम्यानंतर त्याला जातीय, भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत दुफळीचे असे अनेक फाटे फोडण्यात आले. त्यावरून सोशल मीडियावरून कंड्या पिकविण्यात आल्या. खडसे हे बहुजन समाजाचे असल्याने त्यांना मुद्दाम गोवण्यात आले; अशा चर्चा तावातावाने झडू लागल्या. नुकतेच राजकीय पुनर्वसन झालेले नारायण राणे यांच्यासारख्या तोंडाळ नेत्याने त्याला वारा दिला. वास्तविक यावर राणेंनी केलेल्या वक्तव्यातच विरोधाभास आहे.
‘भ्रष्टाचाराच्या विरोधात बाता मारणाऱ्या पक्षाच्या रक्तातच भ्रष्टाचार भिनला असल्याचा आरोप राणे यांनी आधीच्या वाक्यात केला आणि नंतरच्या वाक्यात खडसे ‘बहुजन’ असल्याने त्यांना गोवण्यात आल्याचे ते म्हणाले. म्हणजे भ्रष्टाचार झाल्याचाही त्यांचा दावा आहे आणि खडसेंना मुद्दाम गोवण्यात आल्याचाही! हे काय गौडबंगाल आहे?

खडसेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ जळगावातील १५ नगरसेवकांनी राजीनामे दिले; त्याबरोबरच त्याच जळगावात पेढेही वाटले गेले. या शिवाय आणखी एक आक्षेपार्ह प्रकार खडसे यांचे समर्थक म्हणविल्या जाणाऱ्यांनी केला. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर ३० – ४० जणांच्या टोळक्याने मुख्यमंत्री आणि महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यामधून खडसे यांना मुख्यमंत्री आणि महाजनांच्या नाराजीमुळे पद सोडावे लागले; असे दर्शविण्याचा; पर्यायाने या राजीनामा प्रकरणाला जातीय रंग देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अशाच प्रकारच्या चर्चा आजही सोशल मीडियावर जाणीवपूर्वक घडविल्या जात आहेत.

वास्तविक धुतल्या तांदळासारखे नेते असा खडसे यांचा लौकीक कधीही नव्हता. आपल्याला हवे ते साध्य करण्यासाठी कोणत्याही स्तरापर्यंत जाऊन सर्व बाबी ‘मॅनेज’ करण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत होते. त्यामुळे त्यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी ‘अर्थपूर्ण’ संबंध होते हे जाहीर आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे; तर देशाच्या पातळीवर एक जबाबदार,अभ्यासू आणि कर्तृत्ववान नेते म्हणून मान्यता असलेले शरद पवार यांनीही खडसे हे जळगावच्या तत्कालीन पालकमंत्र्यांकडून ‘हप्ते’ वसूल करीत असल्याचा आरोप केला होता. पवार हे ‘उचलली जीभ; लावली टाळ्याला;’ अशा वृत्तीचे नेते नाहीत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपाला निश्चितच महत्व आहे. त्यामुळे आता खडसेंची चौकशी होणार असेल तर या ‘हफ्ते’खोरीची आणि हप्ते देणाऱ्यांचीही चौकशी करावी.

खडसे यांच्या राजीनाम्याला मूळ आरोपांना नजरेआड करून इतर रंग देण्याऐवजी खडसेंची काटेकोर चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांना योग्य ती शिक्षा करावी आणि दोषी नसल्यास त्यांना पुन्हा मंत्रीच काय; मुख्यमंत्री करा म्हणून पाठपुरावा करणे हेच न्याय्य आणि योग्य आहे.

Leave a Comment