खडसे का अडचणीत आले?

eknath-khadse
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पिंपरीजवळच्या साडेतीन एकर जमिनीसाठी गैरव्यवहार केला आणि त्यांना राज्याचे महसूलमंत्रीपद सोडावे लागले. एकनाथ खडसे यांची ही मंत्रिमंडळातून झालेली गच्छंती तात्पुरती आहे की कायमची आहे याविषयी आता चर्चा सुरू झालेली आहे. परंतु त्यांच्यावरील आरोपांचे स्वरूप पाहिल्यानंतर आणि त्यांच्या मागे आरोपाचा ससेमिरा लागण्याची कारणे पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की एकनाथ खडसे हे पूर्णपणे छगन भुजबळ यांच्याच मार्गाने पुढे गेलेले आहेत. त्यांच्या विरोधात सज्जड पुरावे समोर आले तर कदाचित त्यांनाही भुजबळ यांच्याप्रमाणेच प्रदीर्घ जेलवारी करावी लागेल असे संकेत मिळत आहेत. खडसे आणि भुजबळ या दोघांकडे पाहिल्यानंतर मनात एक असा प्रश्‍न उद्वतो की राजकारणच नव्हे तर अनेक क्षेत्रांमध्ये पुढच्याला ठेच लागली तरी मागचा माणूस शहाणा का होत नाही? खडसे यांच्याबाबतीत तर हा प्रश्‍न फारच तीव्रतेने मनात येतो. कारण छगन भुजबळ यांचे प्रकरण ताजे आहे आणि तरीही खडसे त्यांच्याच तंत्राने वागत आहेत.

छगन भुजबळ अडचणीत आले तेव्हा पक्ष त्यांच्या मागे उभा राहणार की नाही असा प्रश्‍न निर्माण झाला. भुजबळांना तशी खात्री वाटत होती. पण तो त्यांचा भ्रम ठरला. तसाच प्रकार एकनाथ खडसे यांच्याबाबतीतही होणार आहे. हे अगदी उघड आहे. तरीही पक्ष आपल्यामागे उभा राहील अशा भ्रमात खडसे राहिले आणि अजूनही ते त्याच भ्रमात आहेत. संकटाचे ढग अधिक गहिरे व्हायला लागले की भुजबळ यांनी जातीचा वापर केला आणि आपण केवळ बहुजन समाजातले आहोत म्हणून आपल्याला राजकारणातून हद्दपार करण्यासाठी ही आपल्याविरुध्द कटकारस्थाने केली जात आहेत असा कांगावा सुरू केला. आपले हे बहुजन समाजातला असण्याचे स्वरूप अधिक गडद व्हावे म्हणून त्यांनी पूर्वी काही दिवस खूप नाटके केली होती. ओबीसी आघाडी संघटित करण्याचा प्रयत्न केला होता. त्याशिवाय एक वेगळी संघटना स्थापन केली होती आणि ते महात्मा फुले यांची जयंती आणि पुण्यतिथी मोठ्या प्रमाणावर साजरी करत होते. मात्र आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्यांनी ही सोंेगे केेलेली होती. त्यांच्या त्या बहकाव्यात आलेल्या काही लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांच्या मागे उभे राहण्याचे पवित्रे घेतले, आंदोलने केली परंतु या गोष्टींचा छगन भुजबळ यांच्या विरोधातील कारवाईवर काहीही परिणाम होणार नाही हे लक्षात आल्यावर हे पाठिराखे थंड पडले. आता एकनाथ खडसे यांचे पाठिराखे त्यांचेच भ्रष्ट अनुकरण करत आहेत.

छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे हे दोघेही आपल्या बहुजन समाजातील असण्याचा अनावश्यक फायदा घेत होते. आपल्यामागे बहुजन समाज असल्यामुळे आणि आपला जनाधार मोठा असल्यामुळे आपल्याला पक्ष किंवा कोणीच आव्हान देऊ शकणार नाही अशा भ्रमात ते होते. हे दोघेही आपल्या उपद्रवमूल्यावर नको एवढी भिस्त ठेवून होते. आपल्याला पक्षाने धक्का लावायचा प्रयत्न केला तर पक्षाचे भारी नुकसान होईल आणि त्या नुकसानीचा विचार करून आपल्याला भ्रष्टाचार करूनही अभय मिळेल असे ते समजत होते. वास्तविक पाहता हे अज्ञान तर आहेच पण प्रत्यक्षात आजपर्यंत असे कधीही घडलेले नाही. अनेक पक्षातील अनेक कार्यकर्ते अशा भ्रमात राहिले, बाहेर पडले परंतु आपण समजतो तेवढे आपले उपद्रवमूल्य तेवढे मोठे नाही या वस्तुस्थितीची त्यांना जाणीव झाली आणि ते राजकारणापासून दूर तरी गेले किंवा परत आपल्या पक्षाच्या मुख्य प्रवाहात आले. वास्तविक पाहता खडसे यांच्यापेक्षा गोपीनाथ मुंंडे यांचा जनाधार मोठा होता. परंतु त्यांनासुध्दा त्या जनाधाराच्या भ्रमात पक्षात बंड करण्यावरून पश्‍चात्ताप करावा लागला होता.

भारतीय जनता पार्टी हा पक्ष अशा बहुजन समाजातल्या नेत्यांवर मोठा होतो आणि पक्ष मोठा झाला की अशा नेत्यांना बाजूला सारले जाते असा नेहमीच प्रचार केला जातो. परंतु त्यात वस्तुस्थिती किती आहे याचा कोणी विचार करत नाही. भाजपामधून असे काही नेते बाजूला सरकलेले होते
त्यात कल्याणसिंग, उमा भारती, येडियुराप्पा, केशुभाई पटेल अशा काही नेत्यांचा उल्लेख करता येईल. परंतु हे नेते आपण बहुजन समाजातले असल्यामुळे डावलले जात आहोत अशा भावनेने पक्षापासून दूर गेले पण यथावकाश त्यांना आपल्या बहुजन समाजातील असण्याची खरी किंमत कळली आणि ते पुन्हा भाजपात आले. या सर्वांविषयीचा इतिहास ताजा आहे. एकनाथ खडसे यांनाही हा इतिहास माहीत आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रातला भारतीय जनता पार्टी हा पक्ष काही खडसे यांच्यामुळे वाढलेला नाही. फार तर जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचे या पक्षात वर्चस्व असेल. परंतु आपल्याला कोणी हात लावला तर पक्षाचे फार मोठे नुकसान होईल असा त्यांचा भ्रम आहे आणि तो पूर्णपणे चुकीचा आहे. खडसे यांना भ्रष्टाचाराबद्दल दूर केले आहे आणि त्यांना दूर करणे हे अन्याय्य नाही. त्यामुळे त्यांना दूर करण्याने पक्षाचे कसलेही नुकसान होणार नाही. अशा प्रकारे जातीचा आधार घेऊन दबाव आणणार्‍यांना पक्षाने जुमानता कामा नये आणि भारतीय जनता पार्टीने तसेच केलेले आहे. जे केले ते योग्यच आहे.

Leave a Comment