पत्रकाराची मुस्कटदाबी

press
बिहारमध्ये गेल्या आठवड्यात सिवान येथे एका पत्रकाराची हत्या झाली. या राज्यात लालूप्रसाद यांच्या पाठिंब्याने आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले त्याच दिवशी बिहारमध्ये असे काही होणार याचे संकेत मिळाले होते. तेव्हा तिथे एका पत्रकाराची हत्या होणे हे तिथे स्थापित झालेल्या जंगलराजच्या दृष्टीने साहजिकच म्हणावे लागेल. कारण लालूंच्या राजवटीत सामान्य माणसांना कधीच स्वातंत्र्य उपभोगता येत नाही. लालू आणि राबडीदेवी यांच्या राजवटीला पूर्वी जंगलराज म्हटले जात होते आणि या शब्दाचा शोध तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या नितीशकुमार यांनीच लावला होता. शब्दाच्या टाकसाळीमधून आपणच पाडलेला जंगलराज हा शब्द कधीतरी आपल्याच राजवटीसाठी वापरला जाईल असे नितीशकुमार यांना स्वप्नातसुध्दा वाटले नसेल.

अर्थात नितीशकुमार यांच्यावर ही वेळ काळाने किंवा इतिहासाने आणलेली नाही. त्यांनी ११ वर्षे भाजपाशी हातमिळवणी करून सरकार चालवले होते. त्यांच्या मुख्यमंत्री पदाला भाजपाकडून कसलाही धोका नव्हता. परंतु नितीशकुमार यांना मोदीद्वेषाची इंगळी डसली आणि त्यांनी काही कारण नसताना नरेंद्र मोदींच्या विरोधात भूमिका घेऊन भाजपाशी फारकत घेतली आणि आता त्यांना लालूप्रसाद यादव यांच्याशी हात मिळवणी करून मुख्यमंत्री पद हाकारावे लागत आहे आणि त्यांच्याच राजवटीत आता लालू-राबडी राजवटीला शोभतील अशा घटना उघडपणे व्हायला लागल्या आहेत. पत्रकाराची हत्या हा त्यातलाच एक प्रकार आहे.

सत्ताधारी जनता दल (यू) या पक्षाच्या आमदार असलेल्या महिलेच्या मुलाने त्याच्या गाडीला एका तरुणाने ओव्हरटेक केल्यामुळे त्याचा खून केला. अशा प्रकारे तरुण रक्तामध्ये अविचार असतोच. कायद्याची भीती असल्यास असे तरुण मनमानी करण्यास वचकतात. मात्र आपली आई सत्ताधारी पक्षाची आमदार असल्यामुळे आपले कोणीच वाकडे करू शकणार नाही अशी खात्री वाटून या आमदारपुत्राने आपल्या गाडीला ओव्हरटेक केल्याचा गुन्हा केल्याबद्दल दिवसाढवळ्या तरुणाची हत्या केली. या घटनेनंतर सदर आमदार महिलेच्या घरी धाड टाकण्यात आली तेव्हा तिच्या घरी दारूचा साठा आढळला. हाही जंगलराजचाच प्रकार आहे. कारण नितीशकुमार यांनी राज्यात दारूबंदी केली आहे आणि त्यांच्याच पक्षाच्या आमदाराच्या घरात दारूचा साठा सापडला आहे. विशेष म्हणजे ही महिला आमदार लालूंच्या पक्षाची नसून नितीशकुमार यांच्या पक्षाची आहे.

Leave a Comment