मोदी सरकारमुळे कोणाला आले बुरे दिन?

modi1
सध्या काही माध्यमांकडून देशात असहिष्णुता माजली असल्याचा प्रचार जोरशोरसे केला जात आहे. काही स्वयंसेवी संघटना आणि सत्ता गमावलेले काही राजकीय पक्ष या दुष्प्रचाराला दुजोरा देत आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाही असा काही लोकांचा अंदाज होता परंतु त्यांचा अंदाज चुकीचा ठरवून मोदी पंतप्रधान झाले यामुळे काही लोक दुखावले गेले आहेत. अशा सार्‍यांनी मिळून देशातले वातावरण बिघडत चालले आहे असा बभ्रा करायला सुरूवात केली आहे. खरोखर या प्रचारातील मतलबीपणा आणि खोटारडेपणा लोकांच्या लक्षात येतो. कारण उत्तर प्रदेशाच्या एका खेड्यात एका मुस्लीम व्यक्तीची हत्या झाली याचा अर्थ देशात मुस्लिमांचे जीणे मुश्किल आहे असा होत नाही. हे कोणालाही कळते. मग रोहित वेमुला असो की कन्हैयाकुमार असो. यांच्या प्रकरणातून देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे असे भासवण्याचा प्रयत्न होतो तेव्हाही लोकांना या मागचा खरा हेतू समजतो. मात्र ही सारी मंडळी मोदी सरकारवर नेमकी का बिघडली आहेत हे फार थोड्या लोकांना माहीत असते.

दिल्लीतल्या काही घटनांचा नेमका अंदाज घेतला असता अशा प्रकारच्या प्रचारामागे कोण आणि का आहे याचा बोध होतो. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून सत्तेतल्या दलालांची सद्दी संपवली आहे. लोकांची शासनदरबारी करावयाची कामे करून देणारे दलाल आता अस्तित्वातच नाहीत. पूर्वी या लोकांनी वर्षानुवर्षे ही दलाली करून प्रचंड पैसा कमावलेला आहे. परंतु मोदी सरकारचा कारभारच वेगळा आहे. या सगळ्या दलालांना आता आपले उद्योग थांबवून घरी परतावे लागलेले आहे. अशा लोकांनीच चिडून जाऊन मोदी सरकारच्या विरोधात खरेखोटे आरोप करून हे सरकार लोकांचा विश्‍वास गमावत चालले आहे असा आभास निर्माण करायला सुरूवात केली आहे. मोदी सरकारच्या कोणत्याही मंत्रालयातील काम करून घेण्यासाठी एजंटाची गरजच भासत नाही. त्यामुळे एजंटांना काम उरलेले नाही आणि त्यांच्या गैर पध्दतीने मिळणार्‍या उत्पन्नावर पाणी फेरले गेले आहे. अशा लोकांनी आपल्या सरकार दरबारी असलेल्या वजनचा वापर करून आजवर दिल्लीतली शासकीय निवासस्थाने काबिज केली होती. त्यांचा तो घरावरचा ताबा पूर्णपणे बेकायदा आहे हे माहीत असूनही त्यांना कोणी धक्का लावत नव्हते कारण सत्तेत असलेल्या नेत्यांशी त्यांचे लागेबांधे होते अशा लोकांच्या या बेकायदा जागा मोदी सरकारने मोठ्या प्रमाणावर खाली करून घ्यायला सुरूवात केली आहे. पूर्णपणे शासकीय खर्चाने दिल्लीत आलिशान बंगला मिळण्याची त्यांची चैन बंद झाली आहे आणि त्यांना बुरे दिवस आले आहेत. असेच लोक मोदी सरकारच्या नावाने शिमगा करत आहेत.

मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा दिल्लीतले १५०० सरकारी बंगले या सगळ्या दलालांनी अडवले होते. त्यांना कोणी धक्का लावत नव्हते परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातले ८०० बंगले खाली करून घेतले आहेत. आपण सरकारच्या कृपेने कायम फुकटच्या बंगल्यात दिल्लीत राहणार असे समजून चाललेले हे लोक दुखावले गेले आहेत. कारण आजवर कोणत्याच सरकारने असे बंगले खाली केलेले नव्हते. दुसरा एक हितसंबंधी वर्ग दुखावला गेला आहे तो स्वयंसेवी संघटनांचा या स्वयंसेवी संघटना परदेशातून प्रचंड पैसा आणून देशात त्यांना पैसा देणार्‍यांच्या हितासाठी म्हणून काम करत असत. अशा संघटना इतक्या मातब्बर झाल्या होत्या की त्यांचे हिशोब विचारण्याचीसुध्दा हिम्मत कोणी करत नव्हते. मात्र मोदी सरकारने अशा १५ हजार स्वयंसेवी संघटनांचे परदेशातून पैसे आणण्याचे परवाने रद्द केले आणि उर्वरित संस्थांनासुध्दा परेदशातून पैसे आणायचे असतील तर त्या पैशांचा हिशोब परराष्ट्र खात्याला दाखवावा लागेल असा पूर्वीपासून अस्तित्वात असलेला नियम कडक केला.

आपल्याला कदाचित कल्पना येत नाही. परंतु अशा पध्दतीने भारतातले जवळपास १ लाख लोक स्वयंसेवी संघटनेच्य नावाखाली करोडो डॉलर्स भारतात आणतात आणि भारतातच्या पर्यावरण विषयक तसेच औद्योगिक धोरणावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. अशा संस्था आणि लोकांमध्ये आम आदमी पार्टीचा नेता मनीष सिसोदिया, नेहरू युवा केंद्र संघटना, जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी, सुप्रिम कोर्ट बार असोसिएशन यांचा समावेश होता. त्यामध्ये तिस्ता सेटलवाड, भारताचे माजी सरकारी वकील आनंद ग्रोव्हर, इंदिरा जयसिंग, असे लोकही होते. हे लोक आता दुखावले गेले आहेत. शिवाय दिल्लीतले ज्यांचे बेकायदे बंगले ताब्यात घेतले गेले त्यामध्ये काही पत्रकारही होते. या सगळ्या लोकांनी आता सरकारच्या नावाने शिमगा करायला सुरूवात केली आहे. कारण त्यांचे हितसंबंध दुखावले गेले आहेत. प्रत्यक्षात मोदी सरकारचा कारभार दृष्ट लागावी असा सुरू आहे. सोनिया गांधी यांच्या सरकारला पाच वर्षात जे निर्णय घेता आले नाहीत ते निर्णय मोदी सरकारने अवघ्या वर्षभरात घेतले आहेत. या सरकारने विकासाला जबरदस्त चालना दिली आहे. मात्र देशहिताचे हे निर्णय नजरेआड करून या दुखावलेल्या लोकांनी याकूब, मेनन, अफझल गुल, वेमुला, कन्हैयाकुमार अशा प्रकरणातून मोदी सरकार असफल ठरले असल्याचा भास निर्माण करायला सुरूवात केली आहे.

1 thought on “मोदी सरकारमुळे कोणाला आले बुरे दिन?”

Leave a Comment