व्हिडिओकॉनच्या स्पेक्ट्रमची एअरटेलने केली खरेदी

airtel
नवी दिल्ली – व्हिडिओकॉन टेलिकम्युनिकेशन्सच्या सहा परिमंडळातील (सर्कल) स्पेक्ट्रमची भारती एअरटेलने ४,४२८ कोटी रुपयांना खरेदी करण्याची घोषणा केली आहे. आयडिया व व्हिडिओकॉनमधील स्पेक्ट्रम शेअरिंगचा करार रद्द झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा झाली आहे.
व्हिडिओकॉनच्या बिहार, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश(पुर्व) व गुजरात परिमंडळातील स्पेक्ट्रमची खरेदी भारती एअरटेल करणार आहे. स्पेक्ट्रम व्यवहार मार्गदर्शक तत्वांमधील अटी व इतर अटींची पुर्तता झाल्यानंतर करार पुर्ण होईल, अशी माहिती एअरटेलने सादर केलेल्या निवेदनात दिली आहे.

गेल्यावर्षी केंद्र सरकारने दूरसंचार कंपन्यांना स्पेक्ट्रम शेअरिंगची परवानगी देत ऐतिहासिक निर्णय दिला होता. त्यानंतर आयडिया व व्हिडिओकॉनतर्फे अशा प्रकारचा पहिलावहिला करार निश्चित झाला होता. परंतु काल (बुधवार) दोन्ही कंपन्यांनी हा करार रद्द झाल्याचे जाहीर केले. त्याचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. काही दिवसांपुर्वी भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) भारती एअरटेलसोबत स्पेक्ट्रम शेअरिंगसाठी बोलणी सुरु असल्याचे वृत्त समोर आले होते. परंतु ही चर्चा केवळ प्राथमिक स्वरुपात असल्याचे बीएसएनलने सांगितले होते. रिलायन्स व व्होडाफोनमध्ये देखील याबाबत बोलणी सुरु आहे.

Leave a Comment