कर बुडव्यांवर सरकार करणार कारवाई

arun-jaitley
नवी दिल्ली : आपले उत्पन्न हे शेतीतून मिळालेले उत्पन्न आहे असे दाखवून देशातील अनेक बडे आसामी करचुकवेगिरी करीत आहेत. अशा लोकांना हुडकून काढून त्यांच्यावर सरकार कारवाई करणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत केली. त्यावेळी जेटली विरोधकांना उद्देशून म्हणाले की, या कारवाईत काही विरोधी पक्षातील नेत्यांवर जर कारवाई झाली तर ती राजकीय सूडबुद्धीची कारवाई असल्याची ओरड करू नका, असेही त्यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना बजावले आहे.

कृषि उत्पन्नाच्या नावाखाली होत असलेल्या करचुकवेगिरीबद्दल संयुक्त जनता दल, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या पक्षाच्या सदस्यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता त्यावर उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, आयकरातील सवलतींचा कोणी दुरूपयोग करीत असेल तर अशा व्यक्तींना शोधून कारवाई केली जाईल. या अनुषंगाने काही महत्त्वाच्या व्यक्तींचीही चौकशी सुरू आहे, असे ते म्हणाले. अशा व्यक्तींवर कारवाई झाली तर ती राजकीय सूडबुद्धीने करण्यात आलेली कारवाई असे समजू नका, असेही त्यांनी सुचविले. संयुक्त जनता दलाचे शरद यादव म्हणाले की, शेती उत्पन्न दाखवून सुमारे दोन लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नावरील कर चुकविला गेला आहे सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे.