विजय माल्ल्यांना पैसे काढण्यास मनाई

vijay-mallya
नवी दिल्ली – बंगळुरु न्यायालयाने बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांना दणका दिला असून विजय माल्ल्या त्यांच्या विरोधात सुरु असलेल्या खटल्यातून जो पर्यंत निर्दोष सुटत नाहीत तो पर्यंत त्यांनी दियाजियोकडून मिळणारे ५१५ कोटी रुपये बँक खात्यातून काढू नये असे आदेश न्यायालयाने दिले असून या प्रकरणी पुढील सुनावणी २८ मार्चला होणार आहे.

माल्ल्यांविरोधात सक्तवसुली संचालनालयाने आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे. बँकांकडून कर्ज म्हणून घेण्यात आलेला पैसा विदेशामध्ये धाडण्यात आला का या अंगाने सक्तवसुली संचालनालय चौकशी करण्याची शक्यता आहे. किंगफिशर एअरलाइन्स बंद पडल्यानंतर बँकांची हजारो कोटी रुपयांची कर्जे बुडाली असून बँकांबरोबर एकरकमी तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे माल्ल्या यांनी म्हटले होते. ही कर्जे माझी व्यक्तिगत नसल्याचा दावा माल्ल्या यांचा आहे. या कर्जांपोटी मला व्यक्तिगतरीत्या जबाबदार धरणे योग्य नसल्याचे सांगत हा माझ्या बदनामीचा कट असल्याचेही मल्ल्या यांनी म्हटले होते.

तपास पथकांशी आपण संपूर्ण सहकार्य करू असे मल्ल्या यांनी म्हटले असून आपण फरार होत नसल्याचे सांगितले. डिएगियो या कंपनीकडून ७५ दशलक्ष डॉलर्स घेत युनायटेड स्पिरिट्सच्या अध्यक्षपदावरून मल्ल्या पायउतार झाले आहेत. मी गेली २८ वर्षे अनिवासी भारतीय असून मला फरार म्हटल्याने वेदना होत असल्याचे सांगत आपण पळून जाणार नाही व तपास पथकांना सहकार्य करू असे माल्ल्या म्हणाले आहेत.

Leave a Comment