आज जागतिक महिला दिन

womens-day
जागतिक महिला दिन हा महिलांचा दिवस आहे म्हणजे जगाच्या निम्म्या लोकसंख्येचा दिवस आहे. केवळ तो निम्म्या लोकसंख्येचा दिवस आहे म्हटल्याने त्याचे महत्त्व लक्षात येणार नाही. ज्या लोकसंख्येचा हा दिवस आहे ती लोकसंख्या उपेक्षित लोकसंख्या आहे. एवढे सांगितल्यास या दिवसाचे महत्त्व लक्षात येईल. पण त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ही लोकसंख्या तिच्यात कर्तबगारीची धमक असूनसुध्दा उपेक्षित आहे. या महिलांना हा समाज संधीच देत नाही. त्यामुळे तिची तिच्या आत सूप्त राहिलेली कर्तबगारी ही अप्रकट राहते. मात्र असा एखादा दिवस नेमून देऊन तिच्या क्षमतांवर विचार केला आणि तिला संधी दिली तर ती महिला काय करू शकते हे लक्षात येते. परंपरेने, धर्माने, रूढीने आणि समाजाच्या पुरुषप्रधान वागणुकीमुळे निम्मी मानवता अशी उपेक्षित राहिलेली आहे. तरीही मानवप्राणी स्वतःला प्रगत समजतो. ही खरी दुर्दैवाची बाब आहे. आपण आपल्या आसपास पाहिल्यावर असे लक्षात येते की महिलांना ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळाली त्या त्या सगळ्या क्षेत्रात आपले वेगळेपण सिध्द करून दिले आहे.

महिलांमध्ये मुळातच जीवनाचे गांभिर्य जास्त असते. समान वयाचा मुलगा आणि मुलगी यांचे बारकाईने निरीक्षण केल्यास मुलगी अधिक परिपक्व असते हे लक्षात येते. मुलगे हे चंचल असतात आणि मुलींना लहानपणापासून जीवनाकडे गंभीरपणे बघण्याचे आणि जबाबदारीच्या जाणीवेने वागण्याचे शिक्षण दिलेले असते. मुलगी ही उद्याची माता असते. म्हणून तिला तुझ्या हाती पाळण्याची दोरी आहे हे विसरू नकोस असे सांगितले जाते. त्यामुळे आपल्याला पुढे चालून कुटुंबाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडायची आहे अशी एक सूक्ष्म जाणीव प्रत्येक मुलीमध्ये असते आणि या जाणीवेमुळेच तिच्यात आपोआपच चांगले व्यवस्थापन कौशल्य विकसित झालेले असते. जगातल्या अनेक उद्योगांमध्ये पुरुष आणि महिलांमधला फरक अनेकांनी अनुभवलेला आहे. महिलांचे व्यवस्थापन कौशल्य पुरुषांपेक्षा सरस असते हे विशेषत्त्वाने पुरुषांनी मान्य केलेले आहे. ती सगळ्याच गोष्टींकडे गांभिर्याने पहात असल्यामुळे ते गांभिर्य पुढच्या पिढीत उतरवण्याचे दायित्व आपल्यावर आहे हीही जाणीव तिच्या मनामध्ये सतत जागती असते. अशा सगळ्या गुणांनी मंडित असलेल्या महिलांकडे आणि मुलींकडे पुरुष मात्र हीनत्वाच्या भावनेने बघत असतात. त्यांचा हा दृष्टिकोन सुधारावा आणि त्यांच्या मनात स्त्री जातीविषयी विश्‍वास निर्माण व्हावा यासाठी सार्‍या जगात आज जागतिक महिला दिन पाळला जातो.

आपल्या देशात तर अलीकडच्या काळात महिलांचे हे गुण फार प्रकर्षाने जाणवायला लागले आहेत. दहावी आणि बारावी सारख्या मोक्याच्या परीक्षांचे निकाल जाहीर होतात तेव्हा तर मुलींच्या पासाचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. समान परिस्थितीतील मुले, शिक्षणही समान परंतु लिंगभेदामुळे येणारे गांभिर्य इतके भिन्न असते की मुली घरकामात लक्ष घालूनही मुलांपेक्षा अधिक गुण मिळवतात. हे सारे दिसत असूनही समाजातले पुरुष मुलींकडे किंवा महिलांकडे आदराने तर सोडूनच द्या पण समानतेच्या भावनेनेसुध्दा बघायला तयार नाहीत. अजूनही मोठ्या प्रमाणावर स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले जाते. एखाद्या मुलाचा एखाद्या मुलीशी विवाह होतो तेव्हा आजवर रूढ असलेल्या पध्दतीनुसार मुलगी मुलाच्या घरी जाते हा प्रवाह उलटा करण्याची हिम्मत अजून तरी कोणत्याही देशात दाखवली गेलेली नाही. सगळ्या जगात, सगळ्या जातींमध्ये आणि सगळ्या धर्मांमध्ये मुलगी विवाहानंतर मुलाच्या घरी नांदायला जाते. हा व्यवहार म्हणून मान्य करू परंतु आपल्या भाषेमध्ये या नातेसंबंधाविषयी बोलताना ‘अमक्याची मुलगी तमक्याच्या मुलाला दिली’, अशी भाषा वापरली जाते. तिच्यातूनच समाजाची मानसिकता प्रकट होते.

सध्या तर मुली मोठ्या प्रमाणावर शिकत आहेत आणि भारतात हळूहळू शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे मुलींचे प्रमाण मुलांच्या बरोबर व्हायला लागले आहे. निदान या पातळीवर तरी, मुलीच्या जातीला शिकून करायचेय काय? असा प्रश्‍न विचारण्याचे प्रमाण जवळजवळ शून्य झाले आहे. परंतु या शिक्षणाच्या समान संधीचा अर्थ लोकांच्या मनात मुलीविषयी समानतेची भावना निर्माण झाली आहे असा काढू लागलो तर ती चूक ठरेल. आपल्या समाजामध्ये अस्पृश्यता, रोटी व्यवहार अशा रूढींचा त्याग केला गेला आहे. परंतु त्या त्यागामागे सामाजिक जाणीव आहे असे म्हणता येत नाही. नाईलाज म्हणून, निरुपाय म्हणून आणि आता गत्यंतरच नाही म्हणून या रूढींचा आपण त्याग केलेला आहे. तीच गोष्ट मुलींच्या शिक्षणाला लागू आहे. मुलगा आणि मुलगी यांच्याकडे समानतेच्या भावनेतून बघण्याची वृत्ती वाढली म्हणून मुली शाळेत जात आहेत असे नाही. तर शिकल्याशिवाय मुलींचे लग्न ठरू शकणार नाही या निरुपायापोटीच मुलींना शाळेत पाठवले जात आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षण वाढत असले तरी मुलींकडे समानतेच्या भावनेने बघण्याची प्रवृत्ती वाढली आहे असे काही नाही. तेव्हा समाजामध्ये मुलींकडे समानतेच्या भावनेने प्रवृत्ती वाढवली गेली पाहिजे.

Leave a Comment