
न्यूयॉर्क : अमेरिकेचे अंतराळवीर स्कॉट केली आणि रशियन अंतराळवीर मिखाइल कॉर्निएंको तब्बल एक वर्ष अंतराळात घालवल्यानंतर पृथ्वीवर परतले आहेत. मानवी शरीरावर दीर्घकाळ अंतराळात राहिल्याचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने ही अंतराळयात्रा महत्त्वाची मानली जात होती. स्कॉट यांचा जुळा भाऊ मार्कसोबत त्यांच्या शारीरिक स्थितीची तुलना करुन हा अभ्यास केला जाईल.
३४० दिवसांची अंतराळयात्रा पूर्ण करून पृथ्वीवर परतले स्कॉट केली
कझाखिस्तानातील स्टेपी मैदानात केली, कॉर्निएंको आणि सर्गेई वोल्कोव यांच्यासह अंतराळयान उतरले. चार अंतराळयात्रांचे मिळून केली यांनी एकूण ५२० दिवस अंतराळात घालवले आहेत. हा आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरील विक्रम मानला जातो. अंतराळात उगवण्यासाठी केली यांनी काही बिया नेल्या होत्या. या बिया पृथ्वीवर आणल्या आहेत. अंतराळ आणि पृथ्वीवरील वातावरणाचा बियांच्या वाढीवर कसा परिणाम होतो, हे तपासण्यात येईल. अंतराळात म्हणजेच पृथ्वीच्या परिघाबाहेर उमललेल्या झिनिया या पहिल्या फुलाबाबत जानेवारी महिन्यात घोषणा करण्यात आली होती. ६० ते ८० दिवसात हे फूल अंतराळात उगवल्याची माहिती स्कॉट यांनी शेअर केली होती.
#Thanks for following our #YearInSpace The journey isn't over. Follow me as I rediscover #Earth! See you down below! pic.twitter.com/7byNy6fMG4
— Scott Kelly (@StationCDRKelly) March 1, 2016
