
मुंबई – फ्रीडम २५१ हा जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्यात आला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. मोबाईल फोन कंपन्यांसह मोबाइल ग्राहकांसाठी हा एक धक्काच होता. आता आणखीन एक नवी घोषणा फ्रीडम २५१ हा स्मार्टफोन लाँच करणा-या रिंगिंग बेल्स या कंपनीने केली आहे. आता रिंगिंग बेल्सने केलेल्या या नव्या घोषणेमुळे या फोनसंदर्भात ग्राहकांच्या मनात आणखीन संभ्रम वाढला आहे.
आता कॅश ऑन डिलिव्हरी मिळणार फ्रीडम २५१
आपल्या फेसबुक पेजवर कंपनीने एक पोस्ट अपलोड केली असून या पोस्टमध्ये म्हटले आहे की, फ्रीडम २५१ स्मार्टफोनसाठी आता कॅश ऑन डिलिव्हरीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या पोस्टमध्ये ज्या ग्राहकांनी आधीच ऑनलाइन बुकिंग करुन पैसे दिले आहेत त्यांना फोन कधी मिळणार यासंदर्भात माहिती देण्यात आलेली नाही.
केवळ २५१ रुपयांत लाँच करण्यात आलेल्या फ्रीडम २५१ या फोनच्या बुकिंगला देशभरातुन भरघोस प्रतिसादही मिळत असतानाच काही दिवसांपूर्वी ही बुकिंग बंद करण्यात आल्याचा मेसेज कंपनीच्या वेबसाईटवर आला. यासोबतच पहिल्या टप्प्यात २५ लाख नागरिकांना मोबाईल देणार असल्याची माहिती मिळाली होती.
