बचत गटांना प्रोत्साहन

bachat-gat
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये दुष्काळ आणि शेती व्यवसायाची परवड यामुळे मोठे प्रतिकूल वातावरण असल्याचे चित्र माध्यमांतून उभे केले जात असले तरी प्रत्यक्षात या दुरवस्थेतसुध्दा सुप्तपणे एक आर्थिक उत्क्रांतीचे चित्र दिसत आहे. ते सरसकट दिसत नसले तरी ज्या तुरळक ठिकाणी दिसते तिथले परिवर्तन मनाला उभारी देणारे आणि आशा पल्लवित करणारे आहे. साधारणतः ग्रामीण भागातल्या कष्टकरी समाजाला अजूनही आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे भाग्य लाभलेले नाही. सतत आर्थिक ओढगस्तता आणि कर्जबाजारीपणा हीच अजून त्यांची जगण्याची रीत राहिलेली आहे. या समाज घटकाला आर्थिक स्थैर्य निदान एका पातळीपर्यंत तरी संपन्नता मिळवून देणे आवश्यक आहे. कारण समाजाचा हाच वर्ग परिवर्तनास पारखा झालेला आहे. या वर्गाच्या उन्नतीचे उपाय नेमके काय आहेत या विषयी सातत्याने चर्चा होते परंतु स्वयंसहाय्यता बचत गट हेच त्यांच्या उत्कर्षाचे साधन असल्याचे पुन्हा पुन्हा दिसत आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी १९९९ साली भारतात आले असताना याच गोष्टीची ग्वाही दिली होती.

समाजाचा उत्कर्ष साम्यवादाने होईल किंवा भांडवलवादाने होईल याची कितीही चर्चा करत बसलो तरी त्यातून फोलफटाशिवाय काहीही निर्माण होणार नाही. नामवंत उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांना पूंजीवाद आणि साम्यवाद या पैकी कोणत्या वादाने समाज संपन्न होईल असा प्रश्नय विचारण्यात आला होता तेव्हा त्यांनी मोठे मार्मिक उत्तर दिले होते. पूंजीवादही नव्हे आणि साम्यवादही नव्हे पण कष्टवादाशिवाय समाजाचा उत्कर्ष होणार नाही असे ते म्हणाले होते. आपल्या देशामध्ये त्याचीच वानवा आहे. मात्र लहान प्रमाणावर का होईना पण सातत्याने कष्ट करून स्वतःचा मार्ग स्वतः शोधणार्याा बचत गटांनी शंतनुराव किर्लोस्कर यांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचे दाखवून दिले आहे. बिल क्लिंटन यांनीही राजस्थानातल्या एका खेड्याला भेट दिली होती आणि तिथल्या बचत गटांच्या महिलांशी संवाद साधला होता. त्या बचत गटांच्या महिलांनी दुग्ध व्यवसाय करून गावाचे चित्र बदलून टाकले होते. त्यांचे कौतुक करून बिल क्लिंटन यांनी असा संदेश दिला होता की तुम्ही छोटेमोठे उद्योग चिकाटीने करत रहा त्याच मार्गाने समाजाची प्रगती होणार आहे. अमेरिकेची प्रगती सुमारे २०० वर्षांच्या अशा परिश्रमातूनच झालेली आहे. महाराष्ट्रातल्या बचत गटांनीसुध्दा हळूहळू करत का होईना परंतु समृध्दीकडे वाटचाल सुरू केलेली आहे आणि बिल क्लिंटन यांच्या मार्गावर चालण्याचा संदेश दिला आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आज ज्या गावांमध्ये बचत गट छान चालतात तिथे बचत गटात सहभागी असलेल्या कुटुंबाची आर्थिक ओढगस्तता कमी झाल्याचे दृश्य दिसत आहे. अशा कुटुंबातली मुले चांगले शिक्षण घ्यायला लागली आहेत आणि या बचत गटातल्या महिलांचे लोकांचे शेतात जाऊन काम करण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. बचत गटामुळे झालेले हे परिणाम सुखावह आहे. मात्र महिलांच्या मार्फत सुरू असलेल्या या परिवर्तनाला सरकारने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. महाराष्ट्र शासनाने अशा बचत गटांना व्याजमुक्त कर्ज दिले जाईल अशी काल घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल नागपूरमध्ये केलेल्या या घोषणमुळे ग्रामीण भागाच्या आणि शहरातल्या गरीब वस्त्यांच्या आर्थिक उन्नतीला चांगलाच लागणार आहे. या पूर्वीच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने बचत गटांना ४ टक्के व्याजदराने कर्ज देण्याचे मान्य केले होते आणि काही बचत गटांना असे सवलतीच्या व्याज दराचे कर्ज मिळालेही होते परंतु आता फडणवीस सरकारने या बचत गटाचे व्याजच माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे बचत गटांना प्रोत्साहन देण्याच्या कामात विद्यमान सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे.

उद्योजकता आणि समाजाच्या तळागाळात उभारले जाणारे छोटे मोठे उद्योग यातून देशाची प्रगती होईल हे खरे परंतु अशा लहान उद्योगांना आपल्या तयार मालाच्या विक्रीची व्यवस्था काय करावी हा प्रश्ना सातत्याने सतावत असतो. त्यामुळे राज्य सरकारने आता त्यांच्या तयार उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीकोनाने निर्णय घेतला आहे आणि शहरातल्या मॉलमध्ये बचत गटांच्या उत्पादनांना जागा मिळावी असा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात नागपूर येथे केवळ बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणारे स्वतंत्र मॉल उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. एकंदरीत एका बाजूला बहुराष्ट्रीय कंपन्यांशी करार करून त्यांना देशात मोठे कारखाने काढण्यास प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहेच पण त्याच बरोबरीने सेवा उद्योगामध्ये अशा बचत गटांना प्रोत्साहन देण्याचीही योजना सरकारने आखली आहे. एकंदरीत सर्व बाजूंनी औद्योगिक विकासाचे प्रयत्न चालले आहेत. सर्वांगीण विकासासाठी ते आवश्यकच आहे.

Leave a Comment