‘मायशेक’ देणार भूकंपाची पूर्वसूचना

myshake
मुंबई – आजकाल आपले जीवन खुपच स्मार्ट झाले आहे आणि आपल्या रोजच्या जीवनात महत्वाचा घटक झाला आहे तो आपला स्मार्टफोन आणि स्मार्टफोन म्हटल्यावर अॅप तर आलेच. दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टी या अॅप्समुळे सोप्या झाल्या आहेत. बसल्याजागी सर्व माहिती मिळण्याची सुविधा या अॅप्समुळे शक्य झाली आहे. तुम्हाला-आम्हाला सर्वांना माहितच आहे की, भूकंपामुळे किती मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते, संपत्तीचे नुकसान होते. भूकंप ही नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे निसर्गापुढे आपण सर्वच हतबल आहोत. पण यासर्वांनावर मात करत न्यूयॉर्कमधील संशोधकांनी एक असे अॅप तयार केले आहे, ज्यामुळे भूकंपाची पूर्वसूचना मिळू शकणार आहे.

या अॅपचे नाव ‘मायशेक’ असे असून हे अॅप स्मार्टफोन एक्सीलरोमीटरच्या मदतीने भूकंपामुळे जमिनीच्या पृष्ठभागाला बसणाऱ्या झटक्यांना रेकॉर्ड करते. हे अँड्रॉईड अॅप गूगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करु शकता. या अॅपच्या संकल्पनेचे प्रमुख रिचर्ड एलेन यांनी सांगितले, अमेरिकन भूशास्त्रज्ञांनी सर्वेक्षण, यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, यूनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन यांद्वारे मायशेक हे अॅप चालवले जात आहे. जिथे कायम भूकंप होत असतात किंवा जिथे भूकंप नेटवर्क असतात, अशा ठिकाणी हे अॅप अत्यंत महत्त्वाचे ठरेल. शिवाय, जिथे भूकंपाची पूर्वसूचना देणारी काहीही यंत्रणा नसेल, अशा ठिकाणीही हे अॅप महत्त्वाचे ठरू शकेल.