पृथ्वीच्या परिघाबाहेर फूलले पहिले फूल!

nasa
न्यूयॉर्क : पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात फूल उमलले असून याबाबतची घोषणा नासाच्या वैज्ञानिकांनी ट्वीट करुन केली आहे. पृथ्वीच्या परिघाबाहेर उगवलेली ही पहिली सजीव वस्तू असून ‘झिनिया’ असे या फुलाचे नाव ठेवण्यात आले आहे.

हे फूल नासाचे अंतराळवीर स्कॉट यांच्या प्रयत्नातून उगवले आहे. या फुलाचे काही खास फोटोग्राफ स्कॉट यांनी अंतराळातून शेअर केले आहेत. हे फूल अंतराळात ६० ते ८० दिवसात उगवल्याची माहिती स्कॉट यांनी शेअर केली आहे. ट्विटरवर जारी केलेले हे फूल भारतात उगवणाऱ्या सूर्यफुलासारखे दिसते. महत्त्वाचं म्हणजे हे फूल खाण्यायोग्य असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेत सॅलडमध्ये ‘झिनिया’ हे खाल्ले जाते. अनेक दिवसांपासून वैज्ञानिक हा प्रयत्न करत होते. याआधीही वैज्ञानिकांनी अंतराळ केंद्रातील व्हेजी लॅबमध्ये लेट्यूस उगवली होती. पृथ्वीच्या परिघाबाहेर घेण्यात आलेल्या या फुलामुळे अनेक नवीन गोष्टींचा उलगडा झालेला आहे. येत्या काळात अंतराळात टोमॅटो सारखी पिके सुद्धा घेता येऊ शकतात असेही स्कॉट यांचे म्हणणे आहे.