जळगावच्या शिक्षकाची सायकलीतून प्रदूषणविरहित वीज निर्मिती

combo
जळगाव : जळगावच्या सतीश पाटील या शिक्षकाने व्यायाम करताना सायकलीच्या फिरणाऱ्या पॅडलचा उपयोग करुन वीज निर्मितीचा यशस्वी प्रयोग करुन दाखवला असून या प्रदूषणविरहित वीज निर्मितीवर त्यांच्या घरातील काही उपकरणे सुरु असल्याचे बघायला मिळत आहे.

देशातील विजेची तूट आणि त्यामुळे होणाऱ्या लोडशेडिंगमुळे विजेअभावी अनेक समस्या उभ्या राहत आहेत. आपल्या व्यायाम करण्याच्या सायकलीचा वापर करुन जळगावच्या सतीश पाटील या शिक्षकाने मात्र घरच्या घरी प्रदूषणविरहित वीज निर्मिती करुन आपल्याला लागणारी वीज निर्माण केल्यामुळे त्यांची लोडशेडिंगची समस्या काही अंशी कमी करण्यात यश मिळवले आहे.

रोज पहाटे उठून सतीश पाटील हे नियमितपणे घरच्या घरी सायकलिंग करून व्यायाम करत असताना पॅडल फिरताना त्याची उर्जा वाया जात असल्याचे सतीश पाटील यांच्या लक्षात आले. सतीश पाटील यांना वीज उपकरणांचा अभ्यास आणि त्यांना जिज्ञासू वृत्ती असल्याने त्यांनी या पॅडलच्या वाया जाणाऱ्या उर्जेचा वीज निर्मितीसाठी उपयोग करण्याचा निर्णय घेतला.

काही साहित्य भंगारातून खरेदी करुन सायकलच्या रचनेत थोडीफार फेरफार करुन त्यांनी वीज निर्मितीसाठी छोटेसे जनरेटर त्याला बसवले. आता सायकलचे पायदळ फिरु लागताच १८ डीसी व्होल्ट क्षमतेची वीज निर्मिती होऊ लागली. या विजेची त्यांनी १२ व्होल्ट बॅटरीमध्ये साठवण केली आहे. या साठवलेल्या विजेच्या माध्यमातून त्यांच्या घरातील संगणकासह काही उपकरणे आता चालू लागली आहेत.

विशेष म्हणजे ही वीज निर्मिती कोणत्याही प्रदूषणाशिवाय होत असल्याने सतीश पाटील यांचा हा वीज निर्मितीचा प्रयोग अनेकांचे आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरला आहे. प्रत्येक गावा-गावात व्यायाम शाळांमध्ये अशा प्रकारची वीज निर्मितीची यंत्रणा शासनाने अथवा ग्रामस्थांनी उभी केल्यास लोडशेडिंग काही अंशी तरी कमी होऊ शकेल असा सतीश पाटील यांना आत्मविश्वास आहे.

Leave a Comment