मधुमेही रुग्णांना आता भातसेवन वर्ज्य नाही

rice
रायपूर : भात हा मधुमेहाने पीडित असणा-या रुग्णांच्या आहारात वर्ज्य असतो. कारण भातातील ग्लाकेमिक इंडेक्सचे (जीआय) प्रमाण मधुमेह रुग्णांसाठी शत्रूसारखे असते; पण छत्तीसगडमधील संशोधकांनी तांदळाची अशी प्रजाती शोधल्याचा दावा केला आहे ज्याचा आहारातील वापर मधुमेह पीडितांच्या रक्तातील ग्लाकेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. संशोधकांच्या मते हा तांदूळ खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. केवळ मधुमेह रुग्णांसाठीच नव्हे तर सर्वसाधारण लोकांच्या आरोग्यमय आहाराच्या दृष्टीनेही हा तांदूळ फायदेशीर आहे.

तांदळाची ही नवीन प्रजाती पुढील महिन्यात व्यावसायिक स्वरूपात बाजारात येण्याची शक्यता असल्याची माहिती या संशोधकांच्या पथकाचे नेतृत्व करणारे आणि इंदिरा गांधी कृषि विद्यापीठात आण्विक आणि जैव तंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक असलेल्या डॉ. गिरीश चांडेल यांनी दिली. गेल्या कित्येक वर्षांपासून संशोधकांचे हे पथक मधुमेहग्रस्त रुग्णांना उपयुक्त ठरावे यासाठी जीआयचे प्रमाण कमी असलेल्या तांदळाच्या प्रजातीसाठी संशोधन करीत आहेत. या वेळी संशोधकांना चकित करणारे अनेक निष्कर्ष समोर आले. त्यात छत्तीससगडमधील पारंपारिक चपटी गुरमाटिया तांदळाच्या प्रजातीमध्ये आवश्यक लक्षणे आढळून आल्याचे डॉ. चांडेल यांनी स्पष्ट केले.

या संशोधनात नोंदविण्यात आलेली निरीक्षणे निश्चितच देशातील मोठ्या लोकसंख्येच्या आरोग्यमय आहारासाठी उपयुक्त असल्याचा दावा डॉ. चांडेल यांनी या वेळी केला. त्यासाठी संशोधकांनी छत्तीसगडमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेत उंदरांवर प्रायोगिक स्वरूपात संशोधन केले. त्यामधून संकलित झालेल्या माहितीच्या आधारावर जीआय तांदळाचे सेवन केलेल्या मधुमेहग्रस्त उंदराच्या शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण आणि इन्शुलिन दिलेल्या दुस-या मधुमेहग्रस्त उंदराच्या शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण समान असल्याचे आढळून आले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment