मनमाडची सून होणार डेन्मार्कची फुटबॉलपटू !

cicilia
नाशिक : स्वर्गातच बांधलेल्या असतात लग्नाच्या गाठी अशी जी म्हण आहे त्याला अनुरूप अशीच एक रेशीमगाठ मनमाडमध्ये बांधली जाणार आहे. सातासमुद्रापार राहणाऱ्या डेन्मार्कची सिसिलीया पीटरसनशी मनमाडच्या राहुल एळींजेने आयुष्याची गाठ बांधली आहे. यात एक खास म्हणजे सिसिलीया पीटरसन ही आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आहे.

राहुल आणि सिसिलीयाची ओळख डेन्मार्कच्या आरुस विद्यापीठात झाली. मग या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि हीच मैत्री कधी प्रेमात बदलली हे दोघांनाही समजले नाही. मनमाड शहरातील गायकवाड चौकमध्ये राहणाऱ्या राहुलचे वडील रेल्वेत फीटर तर आई मजुरी करायची. अशा परिस्थितित राहुलने शिक्षण घेतले. दहावीत नापास झालेल्या राहुलने मोठ्या जिद्दीने पुढील शिक्षण घेतले आणि पाहता पाहता तो उच्च शिक्षण घेत थेट परदेशात जाऊन पोहचला. युरोपियन शिष्यवृत्ती त्याच्या प्रबंधकाला मिळाली. तिथे त्याने आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आणि तो डेन्मार्कच्या आरुस विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी करु लागला.

योगामध्येही राहुल हा तरबेज होता. तर सिसिलियालाही योगाची आवड असल्यामुळे दोघांतील संवाद वाढला आणि मैत्री आणखी घट्ट झाली. पुढे प्रेमात मैत्रीचे रुपांतर झाले आणि या दोघांनी लग्नाची गाठ बांधण्याचा निर्णय घेतला. सिसिलिया लग्नापूर्वीच मनमाडमध्ये राहुलच्या घरी आली आहे. सध्या ती भारतीय संस्कृती, रितीरिवाज यांचे धडे घेत आहे. गेल्या काही वर्षांपासून सिसिलिया मनमाडमध्ये येत असल्याने तिला राहुलच्या घरातील सर्वांचा लळा लागला आहे. एवढेच नाही तर कॉलनीतील शेजारीही आता सिसिलियाशी गप्पा-टप्पा मारतात. भाषेची अडचण येत असली, तर भावना समजून घेणे येथे महत्त्वाचे ठरते. तर राहुलचे आई-वडील सिसिलियाशी राहुलच्या विवाहाने आनंदित असल्याचे सांगतात. २००६ पूर्वीचा फुटबॉल विश्वचषकामध्ये डेन्मार्ककडून सिसिलिया खेळली आहे. तर तिचे वडिल हॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. येत्या २० डिसेंबरला राहुल-सिसिलिया विवाहबद्ध होणार आहेत. मनमाडमध्ये होणाऱ्या या लग्नासाठी सिसिलियाचे आई-वडिल, कुटुंबीय, वऱ्हाड डेन्मार्कहून येणार आहेत.

Leave a Comment