हत्येचे कारण गूढच राहणार?

pansare
साम्यवादी नेते गोविंद पानसरे यांच्या खुनाचे गूढ उकलले असल्याचा दावा करून महाराष्ट्राच्या पोलिसांनी आणि सीबीआयच्या अधिकार्‍यांनी सनातन संस्थेचा पाईक समीर गायकवाड याला अटक केलेली असून तो आता न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला अटक करून त्याच्या माध्यमातून डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि प्रा. कलबुर्गी या दोघांच्याही खुन्यांपर्यंत पोहोचू शकू असाही विश्‍वास पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र आता सुमारे दोन महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांच्या हे लक्षात आले आहे की पानसरे यांचा खुनी समीर गायकवाड हा नसून तो दुसर्‍याच कोणीतरी केलेला आहे. समीर गायकवाडची एवढी प्रदीर्घ काळ तपासणी करूनही पोलिसांच्या हाती अजूनपर्यंत काहीही लागलेले नाही.

समीर गायकवाडकडे अनेक मोबाईल फोन होते आणि अनेक सीमकार्डे त्याच्याकडे पडलेली होती. त्यावरून तो मोठा कारस्थानी तरुण असावा असा पोलिसांनी कयास केला होता. शिवाय त्याच्या टेलिफोनच्या काही संवादावरून पोलिसांचा त्याच्याविषयीचा संशय बळावला होता. त्यापैकी दोघांचा तर काटा काढलेला आहे, आता तिसर्‍याची प्रतीक्षा करत आहे ही समीरची वाक्ये पोलिसांना फारच निर्णायक वाटत होती. मात्र प्रत्यक्षात हे दोन्ही पुरावे म्हणावे तेवढे सबळ नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. समीर गायकवाड हा मोबाईल फोन दुरूस्तीचेच काम करत होता. त्यामुळे त्याच्याकडे काही मोबाईल फोन आणि काही सीमकार्डे पडलेली होती. त्यांचा समीरचा खुनामागे हात असल्याचा पुरावा म्हणून काहीही उपयोग नाही हे आता पोलिसांना जाणवायला लागले आहे.

दोघांचा तर काटा काढला हे त्याने काढलेले उद्गार खरे आहेत परंतु तेवढ्यावरून तो काटा त्यानेच काढला आहे हे काही सिध्द करता येत नाही. केवळ बढाई मारण्याच्या हेतूने तो असे बोलला असावा हे आता पोलिसांच्या लक्षात यायला लागले आहे आणि ज्या दोन सबळ पुराव्यांच्या आधारे त्याला अटक केली ते दोन्ही पुरावे असे निरर्थक निघाल्यामुळे त्याच्या तपासाची कारवाई गेल्या दोन महिन्यांपासून आहे तिथेच थांबलेली आहे. एखाद्या खुनाच्या आरोपातील आरोपीला अटक झाली तर त्याच्यावर किमान ९० दिवसात आरोपपत्र दाखल करावे लागते. ही मुदत आता संपत आलेली आहे आणि मुदतीच्या आत आरोपपत्र दाखल करणे शक्य होणार नाही हे आता दिसायला लागले आहे. तसे झाल्यास दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्या नेमक्या कोणी केल्या हे कायमच गूढ राहण्याची शक्यता आहे.

1 thought on “हत्येचे कारण गूढच राहणार?”

Leave a Comment