इसिसचे हिणकस कृत्य

isis
आज सार्‍या जगातल्या मुस्लीम धर्माच्या धर्मवेड्या तरुणांचे इसिसबद्दलचे आकर्षण वाढत आहे. सार्‍या जगाची सत्ता इसिसच्या हातात येऊन जगावर मुस्लीम राज्य येईल अशा भ्रामक कल्पनेत भारतातलेही काही तरुण इसिसच्या नादी लागले आहेत. परंतु त्यांना इसिसमध्ये गेल्यानंतर इसिसचे सत्य स्वरूप कळून यायला लागले आहे. भारत, बांगला देश, पाकिस्तान या दक्षिण आशियाई देशातून पळून जाऊन इसिसमध्ये सामील झालेल्या तरुणांचा अनुभव असा आहे की त्यांना अरबस्तानातल्या दहशतवाद्यांपेक्षा कमी दर्जाचे आणि कमी शूर मानले जाते. घातपाती कारवायांच्या बाबतीत भारतीय तरुण फारसे उपयोगाचे नाहीत असे त्यांना तोंडावर सांगितले जाते. मात्र असे असले तरी त्यांच्याकडून दुय्यम स्वरूपाची का होईना कामे करून घेतली जातात.

भारतातून इसिसमध्ये गेलेल्या काही तरुणांनी सांगितलेली या संबंधातली हकीकत मोठीच विदारक आहे. हे तरुण एकदा तिकडे जाऊन पोहोचले की ते पूर्णपणे आपल्या कह्यात राहिले पाहिजेत अशी इसिसच्या नेत्यांची योजना असते. त्यासाठी तिकडे गेलेल्या तरुणांचे पासपोर्ट ताब्यात घेऊन ते आधी जाळून टाकले जातात. एकदा पासपोर्ट गमावले की या तरुणांचा मायदेशी परत जाण्याचा मार्ग पूर्ण बंद होऊन जातो आणि ते कितीही हिणकस वागणूक मिळाली तरी तिथल्या इसिसच्या अधिकार्‍यांच्या आज्ञा मानत राहतात आणि त्यांच्यासाठी मायदेशी परत येणे हे एक स्वप्नच बनून राहते. मग एकदा त्यांचा असा निरुपाय झाला की त्यांना वाटेल तसे वापरले जाते.

भारतीय तरुणांचा प्रामुख्याने मानवी बॉम्ब म्हणून वापर केला जातो. त्यांना स्फोटकांनी भरलेल्या वाहनात बसवले जाते आणि ते वाहन जिथे न्यायचे असेल तिथला पत्ता सांगितला जातो. या वाहनातील स्फोटकांचा स्फोट कोठे करायचा आहे याची कल्पना त्यांना दिली जात नाही. आपण फक्त स्फोटके वाहून नेत आहोत अशीच त्यांची कल्पना असते. स्फोटके एका विशिष्ट स्थळी नेल्यानंतर तिथून त्यांनी एक मोबाईल फोन नंबर फिरवावा म्हणजे त्या मोबाईल फोन नंबरवरचा माणूस ते वाहन पुढे कोठे न्यायचे आहे याची माहिती देईल असे त्यांना सांगितलेले असते. हा तरुण ते वाहन घेऊन जातो आणि तिथे जाऊन फोन नंबर फिरवतो त्याबरोबर त्या वाहनातील स्फोटकांचा स्फोट होतो आणि त्यात तो तरुणही मारला जातो. कारण तो फोन नंबर अशा रितीने सेट केलेला असतो की तो फिरवताच स्फोट व्हावा. धर्मप्रेमपोटी इसिसमध्ये सामील होणार्‍या तरुणांना याची पूर्वकल्पना नसते.

Leave a Comment