
मुंबई : मुंबईच्या डबेवाल्यांनी आपल्या ग्राहकांना दररोजचे जेवणाचे डबे अधिक जलद गतीने पोहोचविण्यासाठी आता मोटारसायकलचा वापर करण्याचे ठरविले असून मुंबईच्या डबेवाल्यांसाठी टीव्हीएस कंपनीने विशेष वाहन (टीव्हीएस मोपेड) तयार केले असून एका वाहनावर ३० ते ४० डबे अडकविण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे लवकरच सायकलऐवजी मुंबईचे डबेवाले मोटारसायकलवरून डब्यांची ने-आण करताना पाहायला मिळतील.
टीव्हीएसने आणली मुंबईच्या डबेवाल्यांसाठी विशेष दुचाकी
मुंबईत मालाड येथे टीव्हीएस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि डबेवाले यांचा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात याविषयी माहिती देण्यात आली. काही डबेवाल्यांनी मेळाव्यात नव्या वाहनाची नोंदणी केली. काही दिवसांपूर्वी अंधेरी, सांताक्रुझ व अन्य काही ठिकाणी परप्रांतीयांनी डबेवाल्यांच्या व्यवसायात प्रवेश केला होता. ही मंडळी डबे अधिक जलद वेगाने पोहोचविण्यासाठी मोटारसायकलचा वापर करत होती. डबेवाल्यांनाही अशा प्रकारे जलद सेवा द्यायची असेल तर मोटारसायकलचा वापर करणे आवश्यक होते. मुंबईकर डबेवाल्यांच्या अडचणी ओळखून त्यांना सोयीची असेल अशी मोटारसायकल टीव्हीएस कंपनीने तयार केली. या वाहनाची किंमत डबेवाल्यांना परवडेल, त्यांना ती सुलभ हप्त्यावर कशी उपलब्ध करून देता येईल यावर कंपनीने विचार करून हे वाहन तयार केले आहे.
या वाहनाचा परवाना काढणे, वाहनतळ किंवा अन्य जागी ती उभी करणे या आणि अन्य काही अडचणी समोर आहेत. पण त्यातून मार्ग काढला जाईल. असे डबे वाहतूक मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले.
