मानसोपचार आणि वेड

combo2
लोकशाहीमध्ये सत्ता आणि प्रसिध्दी यांची नशा मोठी विचित्र असते. या दोन गोष्टी मिळेनाशा झाल्या की नेते मंडळी बेचैन होऊन जातात आणि काहीतरी बोलून प्रसिध्दीचे झोत वळवून घेण्याचा आटापिटा करायला लागतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या दोघांची ही बेचैनी काल दोन वेगळ्या प्रकारांनी व्यक्त झाली. सत्तेशिवाय जगू न शकण्याची परंपरा असणार्‍या शरद पवार यांच्यासारख्या माणसाला ही अस्वस्थता फार जाणवते. आता त्यांच्या हातात सत्ता नाही त्यामुळे ते प्रसिध्दीच्या वलयापासून दूर गेले आहेत. मात्र काहीतरी निमित्ताने प्रसिध्दीच्या झोतात येण्याची उबळ आवरता येत नाही. काल श्री शरद पवार यांनी शिवसेनेला सत्तेला चिकटलेला मुंगळा म्हटले. सध्या माध्यमांमध्ये कोणाही विषयी केलेली विपरीत टिप्पणी ही हमखास बातमीचा विषय ठरते. त्यामुळे बर्‍याच दिवसांनंतर शरद पवार या टिप्पणीच्या निमित्ताने का होईना पण वृत्तपत्रात झळकले.

शिवसेना हा सत्तेला चिकटलेला मुंगळा आहे. त्यामुळे सरकार पडणार नाही आणि पडलेच तर राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारला पाठिंबा देणार नाही असे विधान पवारांनी केले. यातली खंत वेगळीच आहे. शिवसेना नावाचा सत्तेला चिकटलेला मुंगळा सत्तेपासून दूर जाणार नाही आणि राष्ट्रवादी नावाच्या मुंगळ्याला सत्तेला चिकटण्याची संधी मिळणार नाही. ही त्यांची खरी खंत आहे. सध्या राज्यात दुष्काळ असल्यामुळे दुष्काळाच्या निमित्ताने एखादे विधान करणे हेही प्रसिध्दी मिळवण्यास उपयुक्त ठरते. तेव्हा राज्यातल्या सरकारला दुष्काळाची चिंता नाही, हे सरकार शेतकरी विरोधी आहे असे काहीतरी ठोकून दिले की पेपरात नाव येते. त्याही बाबतीत शरद पवार मागे नाहीत. शरद पवारांची ही अवस्था आहे. त्यांनी राजकारणात ५०-६० वर्षे घालवलेली आहेत. त्यामुळे त्यांना अशा निमित्ताने का होईना पण उपेक्षेच्या अंधारातून बाहेर पडून प्रसिध्दीच्या झोतात येण्याची संधी तरी मिळते. अशोक चव्हाण यांच्यासारख्या लोकांनी काय करावे? त्यांना तर आदर्श प्रकरणात आरोपावर काही बातमी आली तरच प्रसिध्दीचा झोत प्राप्त होतो. त्यामुळे त्यांचीही अस्वस्थता वाढतच असते. तिच्यातून बाहेर पडण्यासाठी अशोक चव्हाण यांनी काल एक विपरीत विधान केले आणि राज्य सरकार शेतकर्‍यांना वेडे ठरवत आहे असा आरोप ठोकून दिला. आत्महत्याप्रवण शेतकर्‍यांचे मानसिक समुपदेशन करण्याचा उपक्रम राज्य सरकारने सुरू केला आहे. त्याला उद्देशून हा आरोप होता.

अशोक चव्हाण हे वेडेपणाचे सोंग घेऊन पेडगावला जात आहेत की खरोखरच त्यांना समुपदेशन म्हणजे काय हे माहीत नाही याचे नेमके आकलन होत नाही. पण मानसिक मनोव्यथा आणि वेडेपणा यात फरक असतो हे बर्‍याच लोकांना माहीत नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांच्या मनात अनेक प्रकारचे गंड निर्माण होत आहेत. कसली तरी भीती त्यांना ग्रासून राहते. काही पूर्वग्रह मनामध्ये दाटून राहतात. काहीवेळा त्यांच्या मनात विचार दबून राहतात आणि त्याचा परिणाम रक्तदाब, हृदयविकार, हायपर ऍसिडिटी अणि क्वचित आत्महत्येचे विचार बळावणे यात होतो. अशा लोकांच्या मनातले दबलेले विचार कोठेतरी व्यक्त करण्याची संधी मिळाली की हे लोक मोकळे होतात आणि त्यांच्या मनावरचा मानसिक तणाव कमी होतो. तेव्हा आजच्या जगामध्ये ही तणावग्रस्तता वाढत चालली आहे. हे तणावग्रस्त लोक म्हणजे वेडे नव्हेत. तणावग्रस्त लोकांना मानसशास्त्रज्ञांची एखादी भेट पुरते. त्या भेटीतून काही वेळा एखादी गोळी दिली जाऊ शकते. या लोकांच्या वेड्यांच्या इस्पितळात दाखल केले जात नसते. वेडेपणा हा वेगळा प्रकार असतो.

कर्जबाजारीपणा आणि अन्य काही कारणांनी आत्महत्येस प्रवृत्त होणारे शेतकरी हे तणावग्रस्त शेतकरी आहेत. म्हणून त्यांच्या मानसिक समुपदेशनाचा कार्यक्रम सरकारने आखला आहे आणि तो योग्य आहे. त्यामागे शेतकर्‍यांना वेडे ठरवण्याचा डाव आहे असा आरोप अशोक चव्हाण करतात तो चुकीचा आहे, तणावग्रस्तता आणि वेडेपणा यातला फरक चव्हाण यांना कळलेला नाही. अशोक चव्हाण यांचा वेडेपणा जरा वेगळा आहे. शेतकर्‍यांची मानसशास्त्रज्ञांकडून समुपदेशन करावे ही योजना देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाच्या सरकारची नाही. ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारनेच आखलेली होती. अमरावती या महसुली विभागामध्ये आत्महत्या विरोधी उपाययोजना म्हणून जो एकात्मिक कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला होता त्यामध्ये समुपदेशनाचा समावेश होता आणि तो झाला तेव्हा अशोक चव्हाण यांच्या कॉंग्रेस पक्षाचेच सरकार सत्तेवर होते. तेव्हा समुपदेशनाचे निमित्त करून अशोक चव्हाण सरकारला चुकीचे ठरवत असतील तर ते माप त्यांच्याच पक्षाच्या सरकारच्या पदरात पडणार आहे. मात्र आपल्या सरकारने जी गोष्ट केली तीच गोष्ट भाजप सरकार करतेय याचे भान नसणारे अशोक चव्हाण भाजपा सरकारला शेतकरी विरोधी ठरवण्याच्या घाईत आपले मानसशास्त्राविषयी अज्ञान प्रकट करत आहेत. प्रसिध्दीच्या झोतात येण्यासाठी काहीही करण्यास तयार असलेले पुढारी कसे वागतात याचा हा एक नमुना आहे.

Leave a Comment