ठाण्यातील वॉटर रिफॉर्म

water-reform
केंद्र सरकार केंद्रातल्या ९८ शहरांना स्मार्ट बनवणार आहे. स्मार्ट सिटी योजनेच्याअंती त्या शहराचे जे स्वरूप आता सांगितले जात आहे ते प्रस्तावित स्वरूप आणि शहरांची आताची अवस्था यातला फरक पाहिला तर फारच वाईट चित्र उभे राहते. कारण मुंबई पुण्यासह सर्व मोठ्या शहरांमध्ये स्वच्छतेचा किती बोजवारा उडालेला आहे हे आपण पहातच असतो. स्वच्छतेसाठी पाण्याची गरज असते आणि मोठ्या शहराच्या पाण्याच्या पुरवठ्यात तर प्रचंड गोंधळ आहे. विशेषतः या शहरांमध्ये जेवढे पाणी लागते त्यापेक्षा जास्त पाणी जलाशयातून उपसले जाते. शेतकर्‍यांसाठी असलेले हे पाणी मोठ्या शहरांसाठी राखीव ठेवले जाते आणि ते पाणी शहरांमध्ये अक्षरशः वाया जाते. शहरातल्या पाण्याचा अपव्यय पाहिला म्हणजे मनाला वाईट वाटते. कारण व्यर्थ जाणारे हे पाणी शेतकर्‍यांच्या तोंडून काढलेले असते.

पाण्याचा अपव्यय हा पाण्याच्या गोंधळाचा एक भाग आहे. त्याशिवाय पाणी शुध्द पुरवले जाते की नाही हा या गोंधळाचा दुसरा भाग आहे. तिसरा भाग म्हणजे या अपुर्‍या आणि अशुध्द पाणी पुरवठ्यावरसुध्दा त्या त्या महानगरपालिका जो खर्च करतात तो वसूल होत नाही. म्हणजे पाण्याच्या वापराचे ऑडिट नाही आणि पाणीपट्टीचेसुध्दा ऑडिट केले जात नाही. परिणामी मोठ्या शहरांच्या पाणी पुरवठ्यावर करोडो रुपयांचाही अपव्यय होतो. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे एक सक्षम मॉडेल बनवण्याची गरज आहे. ठाणे महानगरपालिकेत ४० टक्के पाणी वाया जाते आणि त्यातूनही जो पैसा मिळतो तो पाणी पुरवठ्यावर होणार्‍या खर्चापेक्षाही कमी असतो.

म्हणून ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजय जायस्वाल यांनी ठाण्याच्या पाण्याचे नियमन करणारी योजना आखली आहे. वॉटर रिफॉर्म या नावाने होणार्‍या या उपाययोजनेमध्ये पाण्याच्या उपशापासून लोकांच्या वापरापर्यंत प्रत्येक पातळीवर पाण्याचे ऑडिट केले जाईल. पाण्याला नेमकी गळती कोठे लागते यावर लक्ष केंद्रित केले जाईल. लोक आपल्या घराच्या तोट्या बिनधास्तपणे मोकळ्या सोडतात. कारण कितीही पाणी वापरले आणि कितीही वाया घालवले तरी त्यांच्या पाणीपट्टी काहीच फरक पडणार नसतो. लोकांचा हा बेजबाबदारपणा हाही पाण्याच्या वितरणातील गोंधळाचा एक भागच आहे. तेव्हा संजय जयस्वाल यांच्या या वॉटर रिफॉर्म योजनेत नळांना मीटर बसवण्याची सक्ती केली जाणार आहे. हे मीटर लोकांच्याच खर्चातून बसवले जाणार आहे. या वॉटर रिफॉर्मकडे नीट पाहिले गेले पाहिजे आणि ही उपाययोजना यशस्वी झाली तर ती अन्य शहरातही राबवली पाहिजे.

Leave a Comment