ओझे दप्तराचे

school-bag
शाळांत जाणार्‍या मुलामुलींच्या दप्तरांचे ओझे हा पुन्हा एकदा वादाचा आणि चर्चेचा विषय झाला आहे. आता तर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गाजत आहे. तिथे अशी माहिती देण्यात आली आहे की, एका कुटुंबाला आठवड्याला जेवढी भाजी लागते तेवढयाच वजनाचे दप्तर मुला मुलींच्या खांद्याला लटकलेले असते. हा तर फारच जुलूम झाला. यावर काय उपाय योजिता येईल यावर आता चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी पालक आणि शिक्षकही दप्तरांचे वजन करून पहात आहेत. ते असह्य असल्याचे त्यांना दिसूनही येत आहे. यावर उपाय सांगताना काही लोक वह्या किती कमी करता येतील आणि मुलांच्या तासांची रचना कशी बदलता येईल यावर भर देत आहेत पण कोणीही प्रत्यक्षातल्या दप्तराच्या पिशवीचा विचार करायला तयार नाही.

मुळात भारंभार वजनाची पुस्तके ज्या पिशवीत भरली जात असतात ती पिशवी जड असते. वह्या आणि पुस्तकांवर नाना प्रकारचे प्रयोग करण्याआधी मुलांच्या या पिशव्यांचे वजन कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आता मुले रेक्झिन, फायबर अशा जड मटेरियलच्या पिशव्या वापरत असतात. त्याऐवजी साध्या कपड्याच्या पिशव्या वापरल्या तर दप्तराच्या ओझ्यात मुळातच घट होईल. साधारणतः बाजारात मिळणार्‍या दप्तराच्या पिशव्या किमान अर्धा किलो ते एक किलो वजनाच्या असतात. त्यांना अनेक खिसे असतात. त्या सगळ्या खिशांचा वापर होतोच असे नाही. शिवाय पिशवीचे विभाजन करण्यासाठी अनेक कप्पे केलेले असतात. त्या कप्प्यांमुळेसुध्दा वजन वाढते. असे दप्तराच्या पिशवीचे वजन निष्कारण वाढवलेले असते.

या पिशव्या केवळ फॅशन म्हणून वापरल्या जातात. त्यासाठी वापरलेला कपडा कुजत नाही आणि मुले दरवर्षी नव्या पिशव्या मागतात. त्यावर पालकांचा खर्चही खूप होतो. परिणामी मुलांच्या पाठीवरचे ओझेही वाढते. म्हणूनच कापडाच्या पिशव्या तयार केल्या तर त्यांचे वजनही सुसह्य होईल आणि त्यावर होणारा खर्च कमी होईल. मात्र फॅशन किंवा हौस या गोष्टी साध्य होणार नाहीत. जुन्या काळात शाळेत जाणारी मुले कपड्याच्या पिशव्याच वापरत होते. याची आठवण यावेळी द्यावीशी वाटते.

Leave a Comment