डाळी का भडकल्या?

grain
सध्या भारतभरामध्ये डाळींचे दर असह्य वाटावेत असे वाढले आहेत. सर्वाधिक वापरली जाणारी डाळ म्हणजे तुरीची डाळ. तुरीची डाळ आता सगळ्याच बाजारांमध्ये किरकोळ विक्रीच्या दुकानात १७० रुपये किलोपर्यंत महाग झाली आहे. हरभर्‍याची डाळसुध्दा ६० रुपयांच्या जवळपास आली आहे आणि इतरही सर्व डाळी १०० रुपयांच्या दरम्यान विकल्या जायला लागल्या आहेत. गेल्या महिन्याभरापासून भाववाढ जारी आहेच. पण तुरीची डाळ बाजारात येण्यास अजून दोन-तीन महिने लागणार असल्यामुळे तिचे दर अजून वाढण्याची संभावना आहे. हरभर्‍याची नवी डाळ बाजारात येण्यास तर आणखी चार महिने लागणार आहेत. त्यामुळे हरभर्‍याची डाळसुध्दा बरीच महाग होण्याची भीती आहे. ही भाववाढ सामान्य माणसाला विलक्षण जाचक वाटावी अशी आहे. हे निर्विवाद आहे.

तुरीची डाळ हे खाद्य असे आहे की जे देशाच्या कानाकोपर्‍यात वापरले जाते. अन्यथा तांदूळ आणि गव्हाची विभागणी दक्षिण आणि उत्तर अशी झालेली असते. उत्तरेतले लोक तांदूळ कमी आणि गहू जास्त खातात. त्याउलट दक्षिणेतले लोक भात जास्त आणि पोळ्या कमी खातात. असे असले तरी तुरीची डाळ मात्र दोन्ही भागातल्या लोकांना लागते. म्हणजे तांदळाला दक्षिणेत आणि गव्हाला उत्तरेत मागणी आहे. तुरीच्या डाळीला मात्र दोन्ही भागात सारखीच मागणी आहे आणि मागणीच्या प्रमाणात तुरीच्या डाळीचे उत्पादन कमी आहे. कांद्याचा भाव कधी कधी वाढतो. तसा तो कधी कधी कमीही होतो. पण तुरीच्या डाळीच्या बाबतीत तसे होत नाही.

तुरीची डाळ हंगामात भरपूर प्रमाणात बाजारात आली तरी पुढे तिची टंचाई जाणवणारच आहे याची व्यापार्‍यांना खात्री असते. त्यामुळेच भाव कमी होत नाहीत. याचा अर्थ भारताच्या लोकसंख्येच्या मानाने तुरीचे उत्पादन कमी आहे. गव्हाच्या आणि तांदळाच्या बाबतीत बरेच संशोधन झाले आणि अधिक उत्पादन देणार्‍या जाती विकसित झाल्या. त्यामुळे गव्हाच्या आणि तांदळाच्या बाबतीत तुरीच्या डाळीसारखा प्रश्‍न निर्माण होत नाही. यावर उपाय म्हणजे तुरीचे नवे बियाणे बाजारात येणे. आपण अजुनही परंपरागत बियाणांचाच वापर करत आहोत. एखादे बियाणे वारंवार वापरले गेेले की त्याची उत्पादन क्षमता घटते. त्यामुळे बियाणांवर सातत्याने संशोधन करून अधिक उत्पादन देणारे बियाणे विकसित केले पाहिजे. केवळ तुरीसाठी नव्हे तर हरभरा, मूग, उडीद, मसूर अशा सगळ्याच डाळींच्या बाबतीत संशोधन होण्याची गरज आहे.

Leave a Comment