आर्थिक सुधारणांना वेग द्या: ज्यो बिडेन

joe
वॉशिंग्टन: भारताने आर्थिक सुधारणांना वेग देऊन भारतात व्यवसाय करणे सुलभ करावे; अशी अपेक्षा अमेरिकेचे उपाध्यक्ष ज्यो बिडेन यांनी व्यक्त केली.

यूएस इंडिया बिझनेस कौन्सिलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 40 व्या वार्षिक संमेलनात ते बोलत होते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संमेलनात भारताचे प्रतिनिधित्व केले.

भारताने परकीय गुंतवणुकीवरील निर्बंध शिथिल करावे आणि भारतात आपल्या उत्पादने आणि सेवांची विक्री सुलभपणे करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी; अशी अपेक्षा बिडेन यांनी व्यक्त केली. हे अमलात आणण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील; मात्र त्यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचे हित आहे; असेही ते म्हणाले. बौद्धिक संपदा हक्कांच्या संरक्षणाबाबत भारताने अधिक काटेकोर राहावे; असेही बिडेन म्हणाले. जगातील सर्वात मोठी लोकशाही राष्ट्र असलेल्या भारत आणि अमेरिकेने दहशतवाद आणि जागतिक तापमानवाढ या प्रश्नांवर एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे; असेही त्यांनी नमूद केले.

भारतात अमेरिकन उद्योगांना मोठी संधी असून त्यांनी भारतात गुंतवणूक करावी; असे आवाहन सुषमा स्वराज यांनी यावेळी केले. भारतात नागरीकरणाला प्रोत्साहन देण्याची सरकारची भूमिका आहे. सर्वांना किफायतशीर दरात वीज आणि घरे उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भारतात उत्पादन केलेल्या वस्तू जगभरात वितरित करण्यास प्रोत्साहन देण्याची सरकारची पहिल्या दिवसापासून भूमिका आहे. ती अमेरिकन उद्योगांना उपयुक्त ठरू शकेल; असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.