मदत द्यायला हरकत नाही पण…

dushkal
सध्या चित्रपट अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोघांनी शेतकर्‍यांसाठी मोठे काम हाती घेताले आहेे. त्यांनी काही निधी जमा केला असून तो ते आत्महत्या ग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना देत आहेत. अशा प्रत्येक कुटुं बाला त्यांच्याकडून प्रत्येकी १५ हजार रुपये मिळत आहेत. कार्यक्रम आयोजित करून हे दोघे वाटप करीत आहेत आणि तिथे नानाचे भाषणही होत आहे. या दोघांच्या औदार्याचा मोठा गौरवही होत आहे. ही मदत चांगलीच आहे पण ती वाटप करताना निघालेले नाही सूर अनावश्यक आहेत. हे काम सरकारने करायला हवे पण त्याऐवजी या कलाकारांना करावे लागत आहे अशा शब्दात सरकारवर टीकाही केली जात आहे. पण सरकार काही आपले काम करीत नाही असे नाही.

सरकार तर आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये देत असते. असे आहे तर नानाच्या या कार्यक्रमांत सरकारवर अडून अडून शेरे मारण्याची गरज काय ? सरकार करीत असलेली मदत आणि नानाची मदत यात मोठे अंतर आहे. सरकारला जनतेचा पैसा अनाठायी वाटला जाता कामा नये याची दक्षता घ्यावी लागते. एकाही अपात्र कुटुंबाला पैसे दिले गेले तर सरकारवर टीका होते. म्हणून सरकारला मदत वाटप करताना नियमांचे पालन करावे लागते. नानावर तसे बंधन नाही. त्यांना पात्र अपात्रतेची शहानिशा न करता पैसे वाटता येतात. आता ते आपल्या औदार्याचे कार्यक्रम करीत असल्याने आणि नियमांची आडकाठी येऊ न देता वाटप करीत असल्याने त्यांचे हे काम सरकारपेक्षा उदारतेचे वाटत आहे.

सरकारने केलेल्या मदत वाटपाचे अनेक अंगांनी ऑडिट होत असल्याने ते जपून करावे लागते. नानाच्या पैशाचे पुढे काय झाले याचा नानाही हिशेब मांडणार नाही आणि माध्यमे तर या भानगडीत पडणारच नाहीत. नानाने एका कुटुंबाला १५ हजार रुपये वाटले आहेत. पण हे १५ हजार रुपये त्यांना किती दिवस पुरणार आहेत ? ते १५ हजार संपल्यावर त्या कुटुंबाचे हाल पुन्हा सुरूच राहणार आहेत. म्हणून असे पैसे न वाटता त्यांनी या कुटुंबाला या पैशातून शेळी पालन किंवा दुग्ध व्यवसाय असा एखादा जोडधंदा उभारून द्यायला हवा होता. तसा तो दिला असता तर या कुटुंबांना कायमचे उत्पन्नाचे साधन मिळाले असते आणि त्यांना कायमचा आधार मिळाला असता. नानाची परोपकाराची भावना चांगली आहे आणि त्याबद्दल कोणीही त्याची प्रशंसाच करील पण केवळ परोपकारी भावना पुरेशी नाही. तिला अभ्यासाची जोड असायला हवी आहे.

Leave a Comment