राष्ट्रवादीचा जेलभरो

pawar
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी येत्या १४ सप्टेंबर पासून राज्यात जेलभरो आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातले सध्याचे सरकार मराठवाडयातल्या दुष्काळाबाबत गंभीर नाही. या विभागात भीषण दुष्काळ पडला असूनही अजून या सरकारने दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी कसल्याही उपाय योजना जाहीर केलेल्या नाहीत असा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आरोप आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने दुष्काळग्रस्तांच्या म्हणून ज्या मागण्या पुढे केल्या आहेत त्या मागण्या येत्या १४ तारखेपर्यंत पुर्‍या न झाल्यास आपला पक्ष मराठवाड्यात जेलभरो आंदोलन सुरू करील अशी गर्जना शरद पवार यांनी केली आहे. ही गर्जना करण्याआधी पवारांनी मराठवाड्याचा दौरा केला असून परिस्थितीची पाहणी केली आहे आणि मुंबईत झालेल्या बैठकीत ही घोषणा केली आहे.

खरे तर पवारांनी आपला हा जेलभरो कार्यक्रम सत्तेत असतानाच सुरू केला आहे. त्यांचे मंत्री कधीही जनतेसाठी जेलमध्ये गेलेले नाहीत. त्यांना रस्त्यावरचे आंदोलन कधी मानवलेले नाही. त्यांनी सत्तेवर असताना यथेच्छ भ्रष्टाचार केला असून त्यांमुळे त्यांच्या एकेका मंत्र्याची जेल भरोची तयारी मागेच सुरू झाली आहे. या पक्षाचे एक नेते आणि सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ मतदारसंघाचे आमदार अण्णा भाऊ साठे महामंडळात केलेल्या भ्रष्टाचारामुळे जेल मध्ये गेलेच आहेत. छगन भुजबळ यांचा प्रवास जेलकडे कधी सुरू होईल हे काही सांगता येत नाही. कायद्याची प्रक्रिया लांब असते त्यामुळे हा काही वर्षांचा प्रश्‍न आहे पण जेलची हवा खावी लागेल असे दिसत आहेच.

अजित पवार आणि सध्याचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर आरोप आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीची चक्रे फिरायला लागतील तसा त्यांचाही प्रवास सुरू होण्याची शक्यता आहेे. हा जेल भरो कार्यक्रम सावकाशीने सुरू असताना पवारांनी हा नवा जेल भरो कार्यक्रम सुरू केला. दुष्काळ पडला की शेतकर्‍यांच्या नावाने टाहो फोडायचा, अवास्तव मागण्या करायच्या आणि शेतकर्‍यांची फुकटची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा असा हा सारा उद्योग आहे. प्रत्यक्षात त्यांना शेतकर्‍यांची चिंता नाही. तशी ती असती तर त्यांनी आपल्या सत्तेच्या काळात असे काही तरी उपाय योजिले असते की शेतकर्‍यांना असे वारंवार दुष्काळाला तोंड द्यावे लागले नसतेे. पण आपण काहीच करायचे नाही. सत्तेवर असताना त्यांना लुटून पैसा कमवायचा आणि सत्ता गेली की खोटी सहानुभूती व्यक्त करायची. जेल भरोच्या गप्पा मारायच्या.

Leave a Comment