रंग बदलणारे शिवलिंग

shivling
श्रावणात महादेव पूजेचे महत्त्व अधिक मानले जाते व यामुळे देशभरात जेथे जेथे शंकर मंदिरे आहेत,तेथे भाविकांची मोठी गर्दीही होत असते. राजस्थानातील चंबळ नदीच्या खोर्‍यात असलेल्या धौलपूर येथील अचलेश्वर मंदिरही याला अपवाद नाही. येथे भाविकांची गर्दी जरा जास्तच होते कारण येथील शिवलिंग दिवसातून तीन वेळा रंग बदलते. विशेष म्हणजे अनेक वैज्ञानिक आणि संशोधकांनी त्याबाबत शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे मात्र यामागचे गूढ उलगडू शकलेले नाही. यामुळे हे शिवलिंग चमत्कारी मानले जाते.

वास्तविक हे मंदिर चंबळेच्या खोर्‍यात आणि निबिड जागी असल्याने येथे दरोडेखोर आणि जंगली श्वापदांचे भय होते. त्यामुळे कांही वर्षांपूर्वीपर्यंत येथे फारच तुरळक संख्येने भाविक येत असत. हे शिवलिंग नवसाला पावणारे असल्याची भाविकांत श्रद्धा आहे. विवाह ठरण्यापूर्वी येथे उपवर मुलामुलींनी नवस केला तर त्यांना मनाजोगा जोडीदार मिळतोच मिळतो असेही सांगितले जाते.

हे शिवलिंग दिवसांत तीन वेळा रंग बदलते. दिवसा त्याचा रंग लालसर दिसतो. दुपारी तो केशरी होतो तर सायंकाळी हे लिंग चक्क सावळ्या रंगाचे दिसते. हे मंदिर प्राचीन असून ते 1 हजार वर्षांपूर्वीचे असल्याचेही सांगितले जाते. या शिवलिंगाची ख्याती देशभर पसरली आहे आणि देशाच्या विविध भागातून येथे भाविक दर्शनासाठी येतात.