याही बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर

cm
मोदी सरकारने हरवलेल्या आणि घरातून पळून गेलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना आपापल्या घरी पाठवायची एक मोहीमच हाती घेतली आणि अनेक मुलांची त्यांच्या मायबापांशी भेट झाली. पण यातून आता बेपत्ता झालेली मुले आणि त्यांचे प्रमाण याबाबत नवी माहिती पुढे येत आहे. पण या संबंधातही आपल्याला खंत वाटावी अशी एक बाब आहे ती म्हणजे पळून जाणार्‍या मुलांच्या बाबतीत आणि इतरत्रहून पळून येऊन रस्त्यावर राहणार्‍या मुलांच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. मध्य प्रदेश, प. बंगाल आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतून मुले मोठ्या प्रमाणावर पळून जातात अशी आकडेवारी आता समजली आहे. मध्य प्रदेशातून १० हजार २०० मुले गेल्या वर्षभरात घरातून परागंदा झाली आहेत.

प. बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यातून पळून जाणार्‍या मुलांची संख्या अनुक्रमे ९ हजार ७०० आहे तर महाराष्ट्रातली ९ हजार २०० मुले गायब झाली आहेत. गेल्या वर्षाभरातली ही आकडेवारी आहेच पण आता पोलिसांनी या प्रकारावर अधिक लक्ष केन्द्रित करायला सुरूवात केली आहे आणि गेल्या महिन्यातही महाराष्ट्रातून हजारावर मुले घरातून पळाली आहेत असे त्यांना आढळून आले आहे. मुले अशी का पळतात यावर प्रकाश टाकला गेला पाहिजे. त्याची अनेक कारणे समोर आली आहेत. मुलांवर शाळेत जाण्याबाबत आणि तिथे अभ्यास करण्याबाबत सक्ती केली जाते तेव्हा मुले घरातून पळून जातात. काही घरांत मुलांना सतत जाच सहन करावा लागतो अशाही घरातून मुले पळून जातात. अशी अनेक कारणे आहेत. काही वेळा मुले केवळ थ्रिल म्हणूनही वाईट मित्रांच्या प्रभावाखाली पळून जातात.

अलीकडे मात्र मुले एका नव्या कारणाने पळून जाताना दिसत आहेत. अनेक उद्योगांना पाहिजे तेवढे आणि पाहिजे तेवढ्या स्वस्तात मजूर मिळत नाहीत. अशा कारखानदारांना आणि कंत्राटदारांना लहान मुलांना नेमणे फायद्याचे ठरते. कारण त्यांना पगारही कमी द्यावा लागतो आणि ही मुले कितीही तास काम करीत राहतात. तेव्हा मुलांना पळवून नेणे ही वाढत्या औद्योगीकरणाची एक गरज होऊन बसली आहे. महाराष्ट्रात बालमजूर खूप आहेत आणि ते आपल्या आई वडलांच्या परवानगीनेच कामावर जात असतात. त्यांना आता पळवून नेऊन कामाला लावले जात असल्याचे आढळून आले आहे . काही मुलांना त्यासाठी पळवूनही न्यावे लागत नाही. लहान वयात मौजमजा करण्याची सवय लागली आणि त्यासाठी पालकांकडून पैसे मिळेनासे झाले की मुले घरातून पैशांसाठी पळून जातात.

Leave a Comment