वंचितांना न्याय

servant
भारतात असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना कसल्याही कल्याणकारी सवलती उपलब्ध नाहीत. हे लोक काम करतात तोपर्यंत त्यांच्या हातात पैसा खेळत असतो पण काम करण्याची क्षमता संपली की त्यांचे हाल होतात. कारण त्यांची कमायी बंद होते. हातात पैसा असेपर्यंत मुले बाळे विचारतात पण आता वृद्धांचा सांभाळ करण्याची प्रवृत्ती नव्या पिढीत राहिलेली नाही. काही महाभाग तर आपल्या आईबापांना घरातून हाकलून देतात. काही लोक आपल्या मुलांच्या आश्रयाने राहतात पण त्यांना आपल्याच घरात एवढी उपेक्षेची वागणूक मिळते की यापेक्षा हाकलून दिले तर बरे असे वाटावे. काहींना वृद्धाश्रमांत आसरा घ्यावा लागतो तर काही लोक निराधार अवस्थेत जगत राहतात

आपल्या देशात संघटित कामगारांना भविष्याची तरतूद आहे पण ९३ टक्के लोकांना हाता पायातली शक्ती गेल्यास काय असा प्रश्‍न पडतो. त्यांना काहीतर सोय असली पाहिजे म्हणून सरकारने त्यांच्यासाठी वृद्धापकाळाची पेन्शन द्यायला सुरूवात केली आहे. अशा लोकांना म्हातारपणात काही असाध्य आजार झाल्यास तर त्यांना फार वाईट वागणूक मिळते. काहींना सरकारी दवाखान्यात उपचार मिळतात पण तरीही काही प्रमाणात खर्च करावा लागतोच. उत्पन्नाची कसलीच सोय नसल्याने तोही खर्च झेपत नाही. काही यूरोपीय देशांत सामाजिक सेवांविषयक योजना असतात आणि वृद्धांना आसरा मिळतो पण भारतात अशा योजनांना अजून म्हणावी तशी गती आलेली नाही कारण आपली सरकारे आपल्याच खर्चाने टेकीला आलेली असतात. आता देशात वृद्धांचे लोकसंख्येतले प्रमाण कमी आहे कारण तरुणांची संख्या जास्त आहे पण कधी ना कधी देशातल्या लोकसंख्येतले वृद्धांचे प्रमाण वाढणार आहे आणि वृद्धांच्या गुजराणीचा प्रश्‍न गहन होणार आहे.

अशा प्रश्‍नांवर सरकारच्या मदतीच्या योजना हा उपाय आहे हे खरे पण शेवटी या निमित्ताने या वृद्धांना मदतीसाठी सरकारच्याच तोंडाकडे पहावे लागते. आता सरकारने या स्थितीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. असंघटित क्षेत्रातल्या असुरक्षित कामगारांना सुरक्षा देण्याचे ठरवले आहे. यापुढे पूर्णवेळ काम करणार्‍या कोणाही असंघटित कामगाराला दरमहा किमान ९ हजार रुपये वेतन देेणे कायद्याने बंधनकारक ठरवण्यात येणार आहे. त्याशिवाय त्यांना वर्षातून १५ दिवस रजा दिली पाहिजे. त्यातल्या महिलांना बाळंतपणाची रजा दिली पाहिजे अशाही अटी राहणार आहेत याचा अर्थ त्यांना काम करतानाच सक्षम करण्यात येणार आहे म्हणजे ते स्वत:च्या वृद्धपणाची तरतूद स्वत:च करू शकतील.

1 thought on “वंचितांना न्याय”

  1. namrata rajesh lalwani

    माझा पेपर हा वाचकासाठी उत्तम माहिती देणारे साधन तर आहेच शिवाय वेगवेगळे मंनोरंजन करणारे लेख सुदधा यात आहेत. तुमचे कार्य असेच दिवसादिवसे चालत राहो हीच आमच्या वाचकांकडुन शुभेच्छा

Leave a Comment