साथीचे रोग रोखता येतात

rog
महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाने गुंगारा दिला आहे पण मुंबई आणि कोकणात पावसाने चांगली हजेरी लावून आता विश्रांती घेतली आहे. पावसाने विश्रांती घेतली असली तरी आता या पावसाने साचलेल्या पाण्यात डांसाच्या पैदाशीला गती आली आहे आणि दरसालप्रमाणे डासांपासून पसरणार्‍या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे तसेच नव्या मुंबईत पुन्हा एकदा डेंग्यू आणि मलेरियाचा प्रसार होत आहे. गेल्या काही दिवसांत या भागातल्या सरकारी आणि खाजगी दवाखान्यांत या विकाराने पछाडलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. दरसाल प्रमाणे हे रुग्णही दाखल होत आहेत आणि सरकार हे आकडे कमी करून सांगण्यात दंग आहे. सरकारने नाकारले असले तरीही या रोगांच्या प्रसाराचे गांभीर्य काही कमी होत नाही.

खरे तर या रोगांचा प्रसार डासांपासून होत असतो. तेव्हा डासांचा फैलाव हा महानगरपालिकेने थांबवावा अशी आपली अपेक्षा असते. ती काही चूक नाही पण आपल्या देशातल्या स्थानिक स्वराज संस्था या बाबतीत म्हाणाव्या तेवढ्या सक्षम नाहीत. त्यामुळे जागोजाग पाणी साचलेले, त्यात डासांचा प्रादुर्भाव झालेला आणि रोगांचा प्रसार ही दृश्य दरसाल दिसत असते. वृत्तपत्रांतून आरडा ओरडा होतो पण चित्र काही बदलत नाही. कोणत्याही नगर पालिकेचे किंवा महानगरपालिकेचे प्रशासन आपल्या हद्दीत अशा रोगाचा एकही बळी पडणार नाही याची शाश्‍वती देऊ शकत नाही. या बाबत आता नागरिकांवरच जबाबदारी येऊन पडली आहे. पालिकांना करता येईल तेवढे काम करू द्यावे आणि ही आपलीही जबाबदारी आहे याची जाणीव ठेवून आपल्याला शक्य तेवढे उपाय योजणे आता आवश्यक झाले आहे.

डासांचा प्रादुर्भाव साचलेल्या पाण्यात होतो. तेव्हा आपल्या घराच्या आसपास पाणी साचू नये याबाबत नागरिकांनीच दक्ष राहिले पाहिजे. यातूनही असे पाणी साचले तरीही आणि त्यात डांस झाले तरीही त्यांचा त्रास आपल्याला होऊ नये याबाबत काही काळजी घेता येते. सायंकाळी डास घरात शिरतात तेव्हा घरांच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. घरात कोठेही पाणी साचणार नाही हे पाहिले पाहिजे. घरात पाणी साचून राहू नये याबाबत आपण सावध राहिले पाहिजे. लहान मुलांना विशेष करून सांभाळले पाहिजे. डासांचा प्रादुर्भाव आणि फैलाव जेवढा बाहेर साचलेल्या पाण्यातून होतो तेवढाच तो घरात साचलेल्या पाण्यातूनही होतो म्हणून घरात आठवड्यातला एक दिवस कोरडा पाळला पाहिजे. सरकार करायचे ते करीलच पण आपणही सावध राहिले पाहिजे.

Leave a Comment