हे तर व्यवस्थेचे ओझे

school-bag
सरकारने शेवटी शिक्षकाच्या आणि पालकांच्या हातात ताणकाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांना आपल्या मुला मुलींचेही वजन सातत्याने पहावे लागेल आणि त्यांच्या पाठीवरच्या दप्तराच्याही ओझ्यावर लक्ष ठेवावे लागेल. आपल्या मुलांचे वजन पाहून त्याची शाळेत नेण्याची पिशवी भरण्याचे काम त्यांना करावे लागेल. यात किती तरी गंमती आहेत पण आता आता मुलांच्या आणि मुलींच्याही शारीरिक वजनाचा प्रश्‍न गंभीर होत आहे. अर्थात तो अजून ग्रामीण भागापर्यंत पोचलेला नाही पण प्रामुख्याने शहरात जाणवायला लागला आहे. ग्रामीण भागात पिझ्झा आणि बर्गर सरसकट मिळायला लागेल तेव्हा तिथेही हा प्रश्‍न जाणवायला लागणार आहेच. तेव्हा या नव्या कामाने त्यांना आपला पाल्य कसा किलो किलोने वाढत चालला आहे याचीही कल्पना येईल. तो तसा वाढत असेल तर त्याच्या पॉकेटमनीत काही कपात करण्याचा विचार त्यांच्या मनात येईल. काळ बदलतो तसे या समाजाचे प्रश्‍नही कसे बदलतात हे आता लक्षात यायला लागले आहे. शाळेत जाणार्‍या मुलांच्या दप्तराचे ओझे हा कधी काळी प्रश्‍न होईल आणि त्यावर सरकारला एखादी समिती नेमावी लागेल असा २५ वर्षांपूर्वी कोणी विचारही केला नसता.

शाळांत जाणारी मुले काही विषयांची पुस्तके आणि काही वह्या घेऊन शाळेला जात असत. सगळ्या विषयांच्या वह्याही शाळेत नेण्याची पद्धत नव्हती. सर्व विषयांना वाहिलेली एकच रफ वही असायची. तीही गेल्या वर्षीच्या विविध वह्यातल्या राहिलेल्या कोर्‍या आणि पाठकोर्‍या कागदांपासून तयार केलेली असायची. सारा अभ्यास तिच्यात नोंदला जायचा आणि घरी आल्यास तोच अभ्यास फेअर म्हणजे पक्क्या वहीत लिहून काढला जायचा. गाईड नावाचा प्रकार फारच कमी प्रमाणात होता. काही ठराविक मुलांकडेच गाईड असत. हे दप्तर जुने पडदे, वापरून टाकून दिलेल्या पँटी आणि चादरींपासून शिवलेले असे. आता शिक्षणाचा सारा बाजच बदलून गेला. आता दप्तराचे ओझे वाढले. त्यावर नेमलेल्या समितीने सरकारला आपला अहवाल सादर केला आहे. या समितीने दप्तराच्या आत घातल्या जाणार्‍या सामानाबाबत काही सूचना केल्या असल्याचे काल शिक्षण मंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केले. या समितीने दप्तर म्हणून वापरल्या जाणार्‍या पिशवीची काही चौकशी केलेली दिसत नाही. खरे तर ओझे कमी करण्याच्या कामात मुळात पिशवीचा अर्थात ती तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कापडाचाही विचार करायला हवा होता.

दप्तराचे वजन हे मुलाच्या वजनाच्या एक दशांश असावे असे समितीने म्हटले आहे. खरे तर ही सूचना फार हास्यास्पद आहे. एकाच वर्गात शिकणार्‍या मुलांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत न्यावे लागणारे सामान समानच असणार पण त्या सर्वांचे वजन काही सारखे नसणार. मग ४० किलो वजनाची मुले चार किलो वजनाचे दप्तर नेणार आणि त्यापेक्षा कमी वजन असलेल्या मुलाला त्याच्यापेक्षा कमी वह्या आणि पुस्तके न्यावी लागणार. म्हणजे अभ्यास कसा व्हावा हे मुला -मुलींच्या वजनावर अवलंबून असणार. या मुलांची वजन उचलण्याची क्षमता कमी झालेली असते. शहरातली मुले काही पाठीवर दप्तर घेऊन फार चालत नाहीत. पण त्यांना दप्तराचे ओझे असह्य होते. ही समस्या सोडवण्यासाठी त्यांची शारीरिक क्षमता वाढवावी यावर कोणी काही सूचना करीत नाही. मुलांची शारीरिक क्षमता कमी होत आहे हा चिंतेचाच विषय आहे. तिच्यावर भर दिला असता तर हा प्रश्‍नच निर्माण झाला नसता. दप्तराचा प्रश्‍न हा मुळात शिक्षणातल्या कठोर स्पर्धेतून निर्माण झालेला आहे. सध्या एकेका मार्कासाठी लढाई सुरू आहे. त्यामुळे अपेक्षित प्रश्‍नांची माहिती देणारी पुस्तके आणि गाईड यांचा सर्रास वापर केला जात आहे.

गाईड ही पूर्वी चैन समजली जात होती आणि ज्याचा अभ्यास कच्चा असून ज्याला पाठ्यपुस्तकातून प्रश्‍नांची उत्तरे शोधता येत नाहीत त्यांनाच गाईड वापरावे लागत असे. ज्यांना पाठ्य पुस्तकातला धडा वाचण्याचा आळस येतो त्यांच्यासाठी गाईडचा लेखक तो धडा वाचतो आणि उत्तर कसे लिहिले असता चांगले मार्क मिळतील याची माहिती देऊन ते उत्तर तसे लिहून देतो. वेगळ्या शब्दात सांगायचे तर गाइडचा लेखक विद्यार्थ्यांच्या वतिने अभ्यास करतो. असे प्रत्येक विषयाचे गाईड ही आता मुलांची गरज झाली आहे आणि त्याच्या दप्तराच्या ओझ्यात हे गाईड जमा झाले आहे. दप्तराच्या अंतरंगात शिरल्यावर आपल्या बदलत्या शिक्षण व्यवस्थेचे दर्शन घडतेच पण आपल्या सभोवतालच्या बदललेल्या इतरही अनेक गोष्टी नजरेस पडतात. मुलांनी शाळेत कोणते पाणी प्यावे याचा पूर्वी काही नियम नव्हता. बाटलीतले पाणी अजून सर्रास वापरले जात नव्हते. मुळात प्रदूषण कमी असल्यामुळे सार्वजनिक पाणी फारसे प्रदूषित झाले नव्हते. मुलांची प्रतिकारक्षमताही चांगली होती. त्यामुळे शाळेत जे पाणी मिळेल ते मुले पीत असत. आता मात्र पाणीही प्रदूषित झाले आहे आणि प्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे घरून बाटलीत पाणी नेणे मुलांसाठी अपरिहार्य ठरले आहे. ते शाळेत नेताना कशात भरून न्यायचे याचा विचार केला तर निदान अर्धा किलो तरी वजन कमी होईल कारण मुलांना या पाण्यासाठी जड वॉटर बॅगा दिल्या जातात. शाळेत जाताना घरून पाणी नेण्याची गरजच भासू नये असे काही करता येणार नाही का ? शाळांत फिल्टर बसवणे हा त्यावरचा मोठाच उपाय आहे. वॉटर फिल्टर ही काही फार नवलाची बाब राहिलेली नाही. त्याचा खर्च मुलांवर बसवला तर तो पालक सहन करतील.

Leave a Comment