इस्त्रोला आता शुक्राचे वेध

isro
नवी दिल्ली- मंगळमोहीम पहिल्याच प्रयत्नात यशस्वी करणा-या भारतीय अवकाश संस्था इस्त्रोला आता शुक्राचे वेध लागले आहेत. लवकरच शुक्रावर इस्त्रो यान पाठवणार असून त्याद्वारे शुक्राचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. शिवाय काही लघुग्रहांचादेखील अभ्यास करण्याची इस्त्रोची योजना आहे. तर मंगळयान मोहिमेच्या यशानंतर मंगळयान-२ ही मोहीम सुद्धा इस्रोने आखली असून यात एक पाऊल पुढे टाकत मंगळावर थेट रोव्हर उतरवून तेथील वातावरणाचा अभ्यास करण्याची तयारी इस्त्रोने केली आहे.

इस्त्रोच्या पहिल्या मंगळमोहिमेच्या यशानंतर आपल्या पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यान नेणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला होता. तर आत्तापर्यंत मंगळमोहीम यशस्वी करणा-या जगातल्या चार देशांत भारताचा समावेश झाला होता. या मोहिमेनंतर भारताने शुक्रावर जाण्याची तयारी सुरू केली आहे. आत्तापर्यंत फक्त रशिया, अमेरिका आणि युरोपियन अवकाश संस्था हे तिघेच शुक्राच्या कक्षेत आपले यान पाठवण्यात यशस्वी ठरले आहेत. तर जपानने एक अयशस्वी प्रयत्न केला आहे.