डावपेचाला आले उधाण

vidhan-sabha
महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीसमोर काही प्रकरणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात आपल्याला काही तरी मोठे यश आले आहे अशा भ्रमात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मश्गुल आहेत. त्यातल्या त्यात शिवसेनेचे नेते तर फार खुशीत आहेत. आपण सत्तेवर असूनही भाजपाला सामनामधून कसे टोले लगावत आहोत आणि तरीही भाजपाचे नेते ते टोले कसे सहन करीत आहेत अशी खुशीची गाजरे खाण्यात शिवसेना दंग आहे. पण भाजपाच्या नेत्यांनी एकाच दणक्यात या तीनही सत्तातूर पक्षांचे धाबे दणाणून टाकले आहेत. तो दणका त्यांनी गोंदियातून असा काही लगावला की त्यामुळे शिवसेनेने आपले आमदार तपासून पहायला सुरूवात केली. राष्ट्रवादीचा आवाज मलूल झाला आणि कॉंग्रेसला हादरा बसला.

आमदार मंडळी आपल्या पक्षाला निष्ठेने बांधलेले नसले म्हणजे राजकीय पक्षांवर कसा अनवस्था प्रसंग ओढवतो याचे हे एक चांगले उदाहरण आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपला अध्यक्ष निवडून यावा म्हणून भाजपाशी हातमिळवणी केली पण या घटनेपाठोपाठ एक मोठी बातमी फुटली. कॉंग्रेसच्या आमदारांचा मोठा गट फुटून बाहेर पडून भाजपात येणार असल्याच्या त्या बातम्या होत्या. या बातमीने कॉंग्रेसमध्ये आलेले अवसान गळाले तर शिवसेनेला कधीही सत्तेबाहेर जावे लागेल याची जाणीव होऊन हादरा बसला, हादर्‍या पाठोपाठ शिवसेनेने असे काही होणार नाही असे खुलासे करण्याचा प्रयत्न केला पण आतून सारे काही ठीक नव्हते.

राष्ट्रवादीचा तर नूरच बदलला. कारण आता भाजपाला आपल्या छुप्या पाठींब्याची काही गरज नाही याची त्यांना कल्पना आली. तसे झाल्यास आपल्या माजी मंत्र्यांच्या होणार्‍या चौकशीला गती येऊ शकते याची जाणीव त्यांना झाली आणि ही गती कमी करायची असेल तर आपल्याला भाजपाशी जमवून घ्यावे लागेल हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांचा आवाज खाली आला. अशा रितीने भाजपाने गोंदिया जिल्हा परिषदेत एकच टोला मारून आपल्या तिनही विरोधकांना नामोहरम केले. भाजपला स्पष्ट बहुमत नसल्याने त्याला ठायीठायी अडवता येईल अशा भ्रमात असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना या एका कृतीतून ठिकाणावर आणले गेले. भाजपाचा पाठींबा घेऊन कॉंग्रेसचा नेता निवडून आला म्हणून कॉंग्रेसचे नेतेही हादरले आणि त्यांनी संबंधित नेत्याला नोटीस पाठवली पण नंतर हे नोटीस प्रकरणही आपल्याला महागात पडणार असे लक्षात आल्याने कॉंग्रेसच्या नेत्यांनीही शांत बसणे पसंत केले.

Leave a Comment