अहो आश्‍चर्यम

vidhan
गेल्या दोन दिवसांपासून विधिमंडळात राष्ट्रवादी कॉंग्रेश आणि कॉंग्रेेस यांच्यात एकी दिसून आली होती. कारण त्यांनी मिळून सरकारच्या विरोधात गोंधळ घातला होता. या दोन पक्षांचे संबंध कसे आहेत हे सर्वांना माहीत आहे. सत्तेवर असताना त्यांनी कधी एकदिलाने काम केले नाही. विरोधी बाकांवर बसताना मात्र ते एक झाले असल्याचे काही माध्यमांना दिसले. ही काही खरी एकी नाही. प्रश्‍न शेतकर्‍यांचा आहे आणि त्यावर गोंधळ घातला की शेतकर्‍यांची सहानुभूती मिळते हे त्यांना माहीत आहे म्हणून ते एकीचे प्रदर्शन घडवीत होते. पण प्रत्यक्षात त्याच दिवशी त्यांच्या एकीला बेकीचे ग्रहण लागले. गोंदिया जिल्हा परिषदेत कॉंग्रेसने भाजपाच्या मदतीवर आपला अध्यक्ष निवडून आणला.

आजवर अशा प्रकारे भाजपाशी युती करण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच आघाडीवर असायचा. विधानसभेत कॉंग्रेसशी युती करून जिल्हा परिषदेत भाजपाशी हातमिळवणी करण्याचे काम आजवर राष्ट्रवादीचेच नेते करीत असत. हा प्रयोग त्यांनी एक दोन नाही तर १२ जिल्हा परिषदांत केला होता. त्यावेळी कॉंग्रेसच्या नेत्यांना काय वाटले असेल याचा विचार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कधीच केला नाही. आता मात्र त्यांना कॉंग्रेसने भाजपाची मदत घेता धक्का बसला. अर्थात ही बातमी धक्कादायक आहे कारण आजवर देशात अनेक पक्षांनी अनेक पक्षांशी तत्त्वहीन आघाड्या केल्या असल्या तरीही भाजपा आणि कॉंग्रेस या दोन पक्षांत दूरान्वयानेही कधी सहकार्य झालेले नव्हतेे. वाट्टेल ते होईल पण भाजपा आणि कॉंग्रेस हे दोन पक्ष कधी जवळ येणार नाहीत असेच मानले जात होते.

आता हे घडले आहे. कारण कॉंग्रेसला सातत्याने अशा संधीसाधू भूमिका घेणार्‍या राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकदा धडा शिकवायचा होताच. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या एका आमदाराने, ये अंदरकी बात है, उद्धव हमारे साथ है अशी घोषणा दिली होती. राष्ट्रवादीचे हे नवे धोरण असावे. कारण आधी त्यांनीच भाजपाचे सरकार वाचवले होते. भाजपाने न मागता त्याच्या सरकारला बिनशर्त पाठींबा दिला होता. राष्ट्रवादीला गरज पडेल तसे कोणतेही पक्ष चालतात. भाजपा चालतो. शिवसेना चालते आणि कॉंग्रेस तर चालतेच. मग राष्ट्रवादील पदोपदी संधीसाधूपणा करता येतो. तसा कॉंग्रेसला तसा का करता येऊ नये? असे म्हणत कॉंग्रेसने गोंंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादला टांग मारून चक्क भाजपाची साथ घेतली आहे. आता राजकारणात काहीही होऊ शकते असे समजायला काही हरकत नाही.

Leave a Comment