स्वाहाकारावर टांगती तलवार

bjp
भाजपा सरकारवर भ्रष्टाचाराचे आणि बेलगाम आरोप करण्याचे कॉंग्रेसचे सत्र आता गतिमान होण्याची शक्यता आहे. राजकारणात आणि युद्धात आक्रमण हाच उत्तम बचाव असे सूत्र सांगितले जात असते. भाजपा सरकारने कॉंग्रेसच्या भानगडी बाहेर काढून कॉंग्रेसच्या नेत्यांना उघडे पाडण्याचे सत्र आरंभले आहे. त्यामुळे धास्तावलेल्या कॉंग्रेसजनांना आता यातून बचाव करण्यासाठी काय करावे हे सुचेनासे झाले आहे. म्हणून भाजपा सरकारही भ्रष्टच आहे असे सांगत आरोपांचा भांगडा खेळायचा डाव त्यांनी खेळायला सुरूवात केली आहं. चिकीचे प्रकरण कसे बोगस निघाले याचे दर्शन लोकांना घडलेच आहे. म्हणून कॉंग्रेसच्या नेत्यांनी आता या प्रकरणात एसीबीकडे तक्रार दाखल करण्याचे ठरवले आहे.

अशी तक्रार दाखल झाली की त्याचे भिजत घोंगडे पडून राहते आणि हे आरोप कसे बिनबुडाचे आहेत याची फारशी शहानिशा लांबणीवर पडते. तेव्हा अशी प्रकरणे लावून धरण्याऐवजी आरडा ओरडा करायचा आणि तक्रारी दाखल करून नव्या न घडलेल्या प्रकरणात आरोप करीत सुटायचे अशी रणनीती कॉंग्रेसने ठरवली आहे. त्यानुसार आता चिकीला एसीबीकडे सोपवून विनोद तावडे यांना लक्ष्य करीत एका पराचा कावळा करायला सुरूवात केली आहे. यामागचे खरे कारण काय आहे हे लोकांच्या लक्षात येत नाही. कॉंग्रेसचे नेते असे बिनबुडाचे आरोप करून भाजपाला त्रस्त करण्यास का उतावीळ झाले आहेत याचा बोध लोकांना होत नाही. त्यातल्या त्यात भाजपालाच का लक्ष्य केले जात आहे हे कळेनासे झाले आहे.

यामागचे कारण आहे ते भाजपाच्या एका निर्णयात. भाजपा सरकारने आता कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्हा सहकारी बँकांतले गैरप्रकार उघड्यावर आणले आहेत. भुजबळ यांच्या प्रमाणेच या बँकांच्या संचालकांनी बँकांचा पैसा आपल्याच नातेवाईकांकडे वळवून त्यांना बिनातारण लाखोंची कर्जे देऊन मनमानी केली आहे. हे सारे प्रकार आता उघड्यावर यावेत म्हणून राज्य सरकारने राज्यातल्या सगळ्याच सहकारी संस्थांची तपासणी सुरू केली आहे. गेली सहा दशके कॉंग्रेसच्या आणि आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मागचा पुढचा विचार न करता सहकार क्षेत्रात केलेली मनमानी आता उघड झाली तर अण्णा हजारे म्हणतात त्याप्रमाणे हे लोक कसे पांढर्‍या कपड्यातले दरोडेखोर आहेत हे दिसून येणार आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याची धास्ती घेतली असून सरकारवर दबाव यावा म्हणून मंत्र्यांची नसलेली प्रकरणे जाहीर करण्याचे नाटक सुरू केले आहे.

Leave a Comment