
मुंबई : रेल्वे प्रवासात वरचा बर्थ मिळाला की सिनिअर प्रवाशांना किंवा काही कारणास्तव वर चढता येत नसलेल्या प्रवाशांना फार अडचणी निर्माण होतात. खाली बर्थ मिळालेल्या प्रवाशाला विनवणी करावी लागते किंवा मग टीसी कडे दुसरा बर्थ मागावा लागतो. मात्र यापूढे ही विनवणी किंवा दांड्यावर पाय ठेवून चालत्या रेल्वेत वरच्या बर्थवर चढण्याची कसरत करावी लागणार नाही. कारण रेल्वे विभागाने प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक ट्रेनमध्ये आरामदायक पाय-या बसवल्या आहेत.
रेल्वेच्या सर्वच गाड्यांमध्ये बर्थला लागणार पाय-या
काही महिन्यांपूर्वी रेल्वेने केलेल्या एका सर्वेक्षणात प्रवाशांना येणा-या अडचणींबाबत विचारले होते. त्यावेळी अनेकांनी चालत्या ट्रेनमध्ये बर्थवर दांड्यावरून चढता उतरताना होणारा त्रास सांगितला. त्यानंतर रेल्वेच्या २०१५-१६ वर्षाच्या टू डू लिस्ट मध्ये याचा समावेश केला होता. त्यानंतर काही ट्रेनच्या एसी प्रथम श्रेणीच्या कोचमध्ये अशा प्रकारच्या पाय-या बसविण्यात आल्या आहेत. तर लवकरच इतरही ट्रेनमध्ये अशा पाय-या बसविल्या जातील.
एसी प्रथम श्रेणीच्या पाय-यांचे डिझाईन तयार असून द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी एसीच्या डिझाईनचे काम सुरू असल्याचे रेल्वे बोर्डातर्फे सांगण्यात आले आहे. या पाय-या बसविण्यासाठी प्रति कोच २० हजार रूपये खर्च होणार आहे. कपुरथळामधील रेल्वे कोच फॅक्टरीचे इंजिनिअर त्याचं डिझाईन तयार करीत आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे रेल्वेने प्रवास करणा-या ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्वच रेल्वेगाड्यांमध्ये बर्थसाठीच्या पाय-यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. रेल्वे बोर्डाचे त्यासंबंधीचे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे लवकरच ही सुविधा रेल्वेमध्ये उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे.
