एमआयएमचे काय चुकले?

mim
एमआयएमने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्यास विरोध करून त्या ऐवजी लोकांसाठी उपयुक्त असे रुग्णालय उभारावे, या भूमिकेने विशेषतः राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. एकतर राजकारण असो वा समाजकारण भुक्कड भावनांच्या आधाराने चालविण्याची सवय असलेले किंवा सोयीसाठी कोणत्याई मुद्द्याला भावनिक मुलामा देण्यात तरबेज असलेले आपले पुढारी आणि भावूक आंधळेपणाने त्यांच्या मागे जाणारे अनुयायी यामुळे या अजागळ राजकारणाला बळ मिळते आणि विवेकाला मूठमाती! त्यातूनच असे निरर्थक वाद इरीशिरीने लढविले जातात.

विकासकामे आपल्या परीने होतच राअतात. मात्र कोणत्याही समाजाला जशा भौतिक गरजा असतात तशा सांस्कृतिक, भावनिक गरजाही असतात. मोठ्या, कर्तृत्ववान व्यक्तींच्या स्मारकापासून समाजाला त्यांच्या कार्य, कर्त़त्वाची आणि विचारांची ओळख ओते आणि ती प्रेरणा देणारी असते, असा स्मारकवाद्यांचा आवडता सिद्धांत असतो. सैध्दांतिकदृष्टया तो बिनतोड असतो. मात्र व्यवहारिकदृष्टया बघितले तर सध्या अस्तित्वात असलेल्या स्मारकांपैकी काही सन्माननीय अपवाद वगळता बहूतेक ठिकाणी नेत्यांच्या बगलबच्चांनी आपापली संस्थाने निर्माण केली आहेत. या संस्थानांच्या नावावर माया जमविणे, भूखंड लाटणे आणि राजकीय पोळीवर तूप ओढून घेण्याचे प्रकार सुखेनैव सुरू असलेले पदोपदी दिसून येतील.

कल्याणकारी राज्याचा कारभार करण्याची जबाबदारी शिरावर असलेले प्रगतीशील महाराष्ट्राचे सरकारही या दांभिकपणाला अपवाद नाई. ज्या शिवछत्रपतींनी लोकाभिमुख, प्रजाहीतदक्ष राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला, त्या शिवरायांच्या नावाचे राजकारण करण्यात कोणताच पक्ष मागे नाही. त्यातून कुठल्या तरी लोकांना तोंडदेखले खूष करण्यासाठी मागच्या सरकारने शिवस्मारक उभारण्याची घोषणा केली आणि विद्यमान सरकारने त्याची री ओढली. हे स्मारक उभारणार कुठे तर म्हणे मुंबईजवळ खोल समुद्रात! शिवरायांच्या अनेक धाडसी आणि थरारक मोहीमांना यश देणारे आणि कठीण प्रसंगी स्वराज्याला तळआतावरच्या फोडाप्रमाणे जपणारे सह्याद्रीच्या कुशीतले गडकोट सरकारी उपेक्षेने ढासळत असताना जाज्ज्वल्य इतिहासाच्या साक्षीदारांची उपेक्षा करायची आणि खोल समुद्रात कृत्रिम बेट तयार करून त्यावर इतर कशाच्या तरी उंची आणि भव्यतेशी स्पर्धा करणारे स्मारक उभारायचे यात कुठले शहाणपण? आपले प्रधान सेवक नरेंद्र मोदी यांना देखील स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्यापेक्षा उंच असा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारायचा आहे. असली तद्दन दिखाऊ स्पर्धा करू इच्छिणा-या नेते मंडळींनी स्मारके उभारून इतरांना प्रेरणा वगैरे देण्यापूर्वी महापुरुषांच्या इतिहासाचा, त्यांच्या लोकाभिमुख राजकारणाचा अभ्यास करून त्यापासून धडा घ्यावा हे बरे!

राहिला प्रश्न एमआयएमचा! ज्यांचे आजवरचे राजकारण द्वेषाच्या भडकाऊ मार्गावरून त्यांच्या तोंडी विवेक शोभत नाही. त्यालाही मग कट कारस्थानाचा वास येऊ लागतो. मात्र आता एमआयएमला उपरती होऊन वंचितांच्या उन्नतीचे राजकारण करायचे असेल, तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. मात्र कोणत्याही कर्मकांडाचे जंजाळ नसलेल्या आणि शारीरिक, मानसिक आरोग्याच्या प्राप्तीचे प्रभावी साधन म्हणून जगाने स्वीकारलेल्या योगाबद्दल एमआयएमला आकस का? व्यक्तिगत पातळीवर स्वीकारणा-यांनी स्वीकारा आणि नाकारणा-यांनी नाकारा, इतके सोपे असताना योगदिनाचा मुद्दा राजकीय बनविण्याचे कारण काय, याचे उत्तर एमआयएमने द्यावे.

Leave a Comment