मुंडे यांना श्रद्धांजली

munde
कै.गोपीनाथराव मुंडे यांना जाऊन आज बरोबर एक वर्ष झाले. राज्याच्या राजकारणावर त्याचा ठसा होता म्हणूनच त्यांच्या या पहिल्या स्मृतिदिनाच्या मोक्यावर मुंडे यांच्यानंतरचे महाराष्ट्राचे राजकारण या विषयावर कोणी मते मांडणे आणि हे राजकारण कसे आहे याचा उहापोह होणे साहजिक आहे. त्यांच्या निधनाची घटना फार धक्कादायक होती. ही घटना होताच सारे सुन्न झालेे. एखादा नेता वयोमानाप्रमाणे आणि बदलत्या वातावरणाप्रमाणे राजकारणातून बाजूला होतो तेव्हा त्याच्या निवृत्तीचे काही संकेत मिळतात आणि ती निवृत्ती अपेक्षित असल्याने तिच्या परिणामांची काही कल्पना करता येते. पण मुंडे यांचे जाणे असे की, कोणी काहीच सांगू शकत नव्हता. निवृत्त होण्याच्या वयाच्या ऐवजी राजकारणात अधिक उमेदीने काही तरी करण्याच्या मन:स्थितीत असताना त्यांना मृत्यू आला. ते महाराष्ट्राच्या राजकारणाला काहीतरी ऐतिहासिक वळण लावणार असे संकेत मिळत होते. अशा उमेदीच्या क्षणात त्यांचा राजकारणातून अस्त झाला. क्षणभर तर काय होणार याचा कोणालाच अंदाज आला नाही.

आता त्यांच्या जाण्याला एक वर्ष झाले आहे. मुंडे आज असते तर काय झाले असते ? महाराष्ट्राच्या राजकारणात निदान भारतीय जनता पार्टीत तरी १९८० पासून प्रमोद महाजन यांचा अंत होईपर्यंत मुंडे-महाजन युग होते. हे दोघे म्हणतील ते पक्षात तरी घडत होते. त्यांचा राजकारणावर आणि पक्षावर विलक्षण प्रभाव असल्याने हे घडत होते. महाजनांच्या जाण्याने या बाबतीत मुंडे एकटे पडले आणि त्यांचा शब्द भाजपात प्रमाण मानला जाईनासा झाला. या एकटेपणातून त्यांनी अनेकदा उपेक्षा सहन केली पण शेवटी त्यांनी स्वत:ला पूर्णपणे प्रस्थापित केले. ते आज हयात असते तर त्यांचे हे पक्षातले वर्चस्व निरपवाद झाले असते यात काही शंका नाही. भाजपाच्या राजकारणात शिवसेना आणि तिच्याशी असलेली मैत्री फार महत्त्वाची आहे. आज या दोन पक्षांत जी हमरातुमरी सुरू आहे ती मुंडे हयात असते तर आताच्यापेक्षा अधिक परिपक्वपणे हाताळली गेली असती असे वाटते. आताचे मुख्यमंत्री राजकारणात मुंडे यांच्याएवढे परिपक्व नाहीत. म्हणून ते काही बाबतीत केन्द्रातल्या नेत्यांच्या सल्ल्याने चालतात असे दिसते. मुंडे हयात असते आणि ते मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राचा कारभार बराचसा स्वयंपूर्ण झाला असता. शिवाय आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकार्‍यांवर त्यांचा यापेक्षा अधिक वचक राहिला असता. आज मराठवाडा दुष्काळाने होरपळून निघत आहे. कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर या भागातले शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुुंडे ही राजकारणात स्थिर झाली आहे पण ती मराठवाड्याचे नेतृत्व करू शकेल असे काही दिसलेले नाही. गोपीनाथराव हयात असते तर त्यांनी मराठवाड्यातल्या शेतकर्‍यांना चांगलाच दिलासा आणि धीर दिला असता. आज मराठवाड्याचा आवाज म्हणता येईल असा नेता भाजपात तर नाहीच पण विरोधकांतही नाही. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे विधानपरिषदेवर आहेत आणि त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे पण हे पद कर्तृत्वापेक्षाही मुंडे घराण्यात फूट पाडल्याचे बक्षिस म्हणूनच मिळालेले आहे. ही बाब त्यांनी आपल्या एक वर्षाच्या कामातूनही स्वत:च सिद्ध केली आहे. मुंडे यांची ही कसर भरून काढण्यासाठी श्री. शरद पवार हे आता मराठवाड्याच्या दौर्‍यावर आले आहेत आणि मराठवाड्यातल्या शेतकर्‍यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नात शेतकर्‍यांचा कळवळा किती आहे हा संशोधनाचाच विषय आहे कारण तसा तो असता तर आजवर त्यांच्याच सरकारच्या कालावधीत मराठवाड्याची एवढी परवडही झालाी नसती आणि मराठवाड्याच्या विकासाचा एवढा मोठा अनुशेषही वाढला नसता.

एकंदरीत गोपीनाथराव मुंडे यांच्या जाण्याने विशेषत: मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने परळी ते अहमदनगर या नव्या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने खर्च करण्याची तयारी दाखवली आहे. या मार्गाच्या खर्चातला निम्मा हिस्सा राज्य सरकार करणार असून या खर्चाला कालच राज्याच्या मंत्रिमंडळाने अनुमती दिली आहे. कै. मुंडे यांना ही एक प्रकारची श्रद्धांजलीच आहे कारण गोपीनाथ मुंडे राजकारणात शिरले तेव्हापासून म्हणजे जवळपास ४० वर्षांपासून ही मागणी केली जात होती. हा लोहमार्ग नगर-बीड-परळी असा आहे. बीड हा राज्याच्या सर्वात मागासलेल्या जिल्ह्यात एक आहे. परळी ते हैदराबाद असा एक लोहमार्ग या जिल्ह्यातून जातो. या मार्गावर बीड जिल्ह्याचा २० किलोमीटर्स मार्ग आहे. एवढा अपवाद वगळता या जिल्ह्यात एक इंचही रेल्वे नाही. या जिल्ह्याचे दैैन्य असे की त्यातले हजारो ऊस तोड कामगार महाराष्ट्रभर या कामावर जात असतात. या जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा हा लोहमार्ग व्हावा अशी मागणी १९७४ सालच्या मराठवाडा विकास आंदोलनापासून केली जात होती. ती आता मान्य झाली आहे. २०१९ साली हा मार्ग होईल अशी अपेक्षा आहे. बीड जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या विकासाचे प्रकल्प असे मार्गी लागणे हीच मुंडे यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

Leave a Comment