
वॉशिंग्टन – अमेरिकेच्या व्हर्जिनिया येथील एका हवाई कंपनीने आता अफलातून योजना तयार केली आहे. थेट शुक्र ग्रहाच्या आकाशात विमान नेण्याची ही योजना असून, २०२१ मध्ये ही योजना पूर्ण करण्याचा कंपनीचा मानस आहे.
अमेरिकन हवाई कंपनी शुक्राच्या आकाशातून उडविणार विमान
स्पेस डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, नॉर्थराप गू्रमन कॉर्पोरेशन असे या कंपनीचे नाव असून, नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेच्या नव्या ग्रहविषयक विज्ञान स्पर्धेत ही कंपनी सहभागी होणार आहे. शुक्राच्या आकाशात जाणारे हे विमान सर्वसामान्य विमानासारखे नसेल. त्याचे प्रारूप विशेष असेच राहणार आहे.
हवा आणि इंजिनच्या मदतीने उड्डाण घेणारे विमान विकसित करण्याच्या दिशेने कंपनीने पुढाकार घेतला आहे. या विमानाचे पंख बोईंग ७३७ विमानाच्या तुलनेत दोन पटीने मोठे असतील. या विमानाची गती ताशी २२० किलोमीटर असेल. विमानात अत्याधुनिक कॅमेर्यासह अन्य उपकरणेही बसविण्यात येणार आहेत. शुक्र ग्रहाच्या आकाशात भ्रमण करण्यासोबतच या ग्रहाच्या आम्लयुक्त वातावरणाचे नमुनेही ते कॅमेर्यात बंद करेल. आपली ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी कंपनी नासाकडून एक अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत मागणार आहे.
एक अंतराळ यान या विमानाला शुक्राच्या कक्षेत पोहोचविण्याचे काम करेल. शुक्र हा सर्वात उष्ण ग्रह असून, येथील तापमान ४६० अंश सेल्सियस इतके आहे. शुक्राच्या तापमानात चार तास काढणे आणि तेथील माहिती प्राप्त करणे सर्वात मोठे आव्हान असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे. रशियाने १९६०, १९७० आणि १९८० च्या दशकात ‘व्हेनेरा अंतराळ केंद्रातून अनेक यानांना शुक्र ग्रहावर पाठविले. पण, आतापर्यंत एकही यान शुक्राच्या वातावरणात चार तासांपेक्षा जास्त काळ टिकाव धरू शकले नाही, हे विशेष!
