आठव्या शतकातील हिंदू मंदिर बांगलादेशात सापडले

temple
ढाका – बांगलादेशच्या पुरातत्त्व विभागाने ईशान्येकडील एका गावात केलेल्या खोदकामात अतिशय प्राचीन हिंदू मंदिर आढळले आहे. पाला राजघराण्याच्या काळात हे मंदिर बांधण्यात आले असावे, असा अंदाज आहे.

दिनाजपूरच्या बोचागंज भागात खोदकाम सुरू असताना या मंदिराचे अस्तित्व आढळून आले, अशी माहिती जहांगीरनगर विद्यापीठाचे प्राध्यापक स्वाधीन सेन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

ज्या गावात हे मंदिर सापडले, त्या गावाचे नाव मेहरपूर असे आहे. हे मंदिर कदाचित आठव्या किंवा नवव्या शतकातील असण्याची शक्यता आहे. या गावातील शेतकरी त्यांच्या शेतात खोदकाम करीत असताना, अतिशय जुन्या काळातील विटा आढळून आल्या. शिवाय, काही कलाकृतीही जमिनीतून बाहेर आल्या, असे वृत्त सेन यांच्या हवाल्याने स्थानिक वृत्तपत्रांनी दिले आहे.

या मंदिराच्या सभोवताल भिंतही असून, ती अनेक ठिकाणी जळालेली आहे. या परिसरात काही प्राचीन मूर्तीही सापडल्या आहेत. या मंदिराला पायर्‍या असून, आम्ही आणखी खोदकाम करून मंदिर नेमके किती मोठे आहे आणि गाभार्‍यात कोणाची मूर्ती आहे, याचा शोध घेणार आहोत, असे पुरातत्त्व विभागाचे अन्य एक सदस्य सोहाग अली यांनी सांगितले. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी, येथून जवळच असलेल्या एका गावात सुमारे आठव्या ते नवव्या शतकातील बौद्ध विहाराचा शोध लागला होता.

Leave a Comment