कर्करोगाला आमंत्रण देतो साबण, शाम्पूचा अतिवापर; अमेरिकन शास्त्रज्ञांचा इशारा

cancer
वॉशिंग्टन – अमेरिकन विद्यापीठातील नवीन संशोधनानुसार, शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी वापरले जाणारे साबण, शाम्पू, टूथपेस्ट अशा वस्तूंचा अतिवापर चक्क कर्करोगाला निमंत्रण देऊ शकतो. कर्करोगाला कारणीभूत ठरणारा ट्राईक्लोजन घटक साबणात आढळून आला आहे. तसेच शाम्पू व टूथपेस्टमध्येही कर्करोगाला आमंत्रण देणारे घटक आढळून आले आहेत.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील सॅनडिएगो औषध विभागाने आपल्या नवीन संशोधन अहवालात सर्वांनाच साबणाचा अतिवापर टाळण्याचे आवाहन केले आहे. प्राध्यापक रॉबर्ट एच. दुकी यांनी सांगितल्याप्रमाणे, कर्करोग आणि यकृताच्या रोगाला कारणीभूत असलेला ट्राईक्लोजन घटक साबणात आढळून आला आहे. या घटकाचा प्रयोगशाळेत उंदरावर प्रयोग करण्यात आला असता, त्याचे यकृत बिघडल्याचे आणि त्याला कर्करोग झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, उंदरांवर वाईट परिणाम करणारा ट्राईक्लोजन मानवावर तेवढाच वाईट परिणाम करू शकतो, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. उंदरांवर सहा महिने ट्राईक्लोजनचा प्रयोग केला असता त्यांच्यात कर्करोगाची लक्षणे दिसून आली. हा परिणाम मनुष्यावर १८ वर्षात दिसून येऊ शकतो.

ट्राईक्लोजन नावाचा घटक केवळ साबणातच नव्हे, तर अमेरिकेच्या वातावरणात सापडणार्‍या सात प्रमुख घटकांपैकी एक आहे. ट्राईक्लोजन एक रोग प्रतिकारक घटक असला, तरीही त्याचा अतिवापर जीवघेणा ठरू शकतो, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. भारतात देशी-विदेशी कंपन्यांचे साबण, टूथपेस्ट आणि शाम्पू वापरणार्‍यांची संख्या प्रचंड आहे. नवीन संशोधनातील गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनी या वस्तूंचा वापर सावधपणेच केला पाहिजे आणि त्याचा अतिवापर टाळलाच पाहिजे.

Leave a Comment