नष्ट होण्याच्या मार्गावर गेंडे, हत्ती, गोरिला

elephant
वॉशिंग्टन : अनेक कारणांनी जगभरातील तृणभक्षक प्राण्यांची संख्या कमी होत असून वन्य जीवन नष्ट होत आहे. वन्य प्राण्यांची संख्या नष्ट झाल्यामुळे उजाड माळरानांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गेंडे, हत्ती व गोरिला यासारखे तृणभक्षक प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर असून त्यांची संख्या ६० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. एकूण ७४ तृणभक्षी प्रजातींचा अभ्यास केला असता त्यांची संख्या शिकार व अधिवासाची हानी यामुळे कमी होत चालल्याचे दिसून आले, ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. यापूर्वीच्या अभ्यासातही तृणभक्षी प्राण्यांच्या संख्येत अशीच घट दिसून आली होती.

आग्नेय आशिया, भारत व आफ्रिका या देशात वन्य प्राण्यांची संख्या कमी होत असून युरोप व उत्तर अमेरिकेत अनेक तृणभक्षी प्राणी नष्टचर्याच्या मागच्या लाटेतच नष्ट झाले आहेत. ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रा. विल्यम रिपल यांच्या मते रेनडिअरपासून आफ्रिकी हत्तींपर्यंत संख्या कमी झाली आहे. प्रथमच या सर्व तृणभक्षी प्राण्यांचा एकत्रित अभ्यास केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. प्राण्यांची संख्या कमी झाल्यामुळे सवानाहच्या जंगलात काही दिवसांनी उजाड माळरान दिसण्याची शक्यता आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वन संवर्धन संशोधन विभागाचे प्रा. डेव्हिड मॅकडोनाल्ड व इतर २५ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांनी यात भाग घेतला. मांसभक्षक वाघ व सिंह यासारख्या प्राण्यांनाही शिकारीचा फटका बसत असून त्यांचा अधिवासही कमी होत आहे पण या वैज्ञानिकांनी संशोधनात आणखी भर टाकली असून जरी या प्राण्यांना अधिवास मिळाला तरी त्यांना खाण्यासाठी काहीच नसेल त्यामुळे ही परिस्थिती चिंताजनक आहे.

संशोधनानुसार अधिवास नष्ट होणे, शिकार करण्यासाठी प्राणी नसणे, अन्न व साधनांसाठी स्पर्धा यामुळे प्राण्यांच्या संख्येत घट होत आहे. गेंड्याच्या शिंगाची किंमत सोने, हिरे व कोकेनपेक्षा जास्त आहे त्यामुळे एकशिंगी गेंडा वीस वर्षांत आफ्रिकेतून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

Leave a Comment