पवारांची भविष्यवाणी

sharad-pawar
शरद पवार केन्द्रात कृषि मंत्री होते तेव्हा देशातली महागाई भरमसाठ वाढत होती. ती वाढत चालली की पत्रकार पवारांना ही महागाई कधी आटोक्यात येणार असा प्रश्‍न विचारत असत. पवारही येत्या रबी हंगामात किंवा खरीप हंगामात असे ठोकून देत असत. पुढे पुढे हा नित्याचा प्रकार झाला पण महागाई कमी होण्याऐवजी वाढतच चालली. प्रश्‍न मात्र येत राहिले. पवारांनी एकदा अशा प्रश्‍नावर चिडून उत्तर दिले. महागाई कधी आटोक्यात येईल हे सांगायला मी काय ज्योतिषी आहे का ? तेव्हा ज्योतिषी असल्याचे नाकारणारे पवार आता मात्र भाजपा-सेना युतीचे सरकार येत्या काही दिवसांत पडणार करीत आहेत आणि ही अभद्रवाणी उच्चारायला ज्योतिषी झाल्याचा आव आणत आहेत. ते स्वत:ला स्वत:ला राष्ट्रीय वगैरे नेते म्हणवून घेत असले आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांनी त्यांना तशी बिरुदं वाहिली असली तरीही पवारांचे ते कथित राष्ट्रीय राजकारण वरचेवर कसे टिनपाट बनत गेले आहे याचे हे एक उदाहरण आहे.

पवार महाराष्ट्राच्या बाहेर कधीही प्रभावी भूमिका वठवू शकलेले नाहीत. महाराष्ट्रातही त्यांच्या पक्षाला गळती लागली आहे. आता त्यांना राजकारणात फारसे स्थान उरलेले नाही. पवारांनी राज्यातले राजकारण मागे एकदा गाजवले आहे. तेव्हाचा काळ, राजकारणाची शैली आणि वातावरण यात आता बराच बदल झाला असल्याने आता पवारांची सद्दी संपली आहे. त्यांच्या राजकारणाच्या शैलीचेही आता फारसे काही औचित्य राहिलेले नाही. पण ते भाजपाच्या हातात सत्ता गेल्याने चिडले आहेत. पण त्यांना जुनेच फंडे हाताळावे वाटत आहेत. सरकारच्या पतनाची शापवाणी उच्चारणे हीही शैली आता फार जुनी झाली आहे. केन्द्रातल्या मोदी सरकारच्या बाबतीतही असेच काही घडेल अशी आशा कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटत होती पण ते सरकार वरचेवर स्थिर होत आहे आणि कॉंग्रेसच्या नेत्यांचा भ्रमनिरास झाला आहे. पवारांनी आता महाराष्ट्राच्या राजकारणात अशीच उलथापालथ होण्याची शापवाणी उच्चारली असून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर राज्यातले युतीचे सरकार कोलमडेल असे भाकित वर्तवले आहे. पवारांच्या या भविष्यवाणीचे विश्‍लेषण करण्याची गरज आहे. कोणताही पराभूत पक्ष सत्ताधारी पक्षाच्या चुका दाखवतच असतो. त्या चुका लोकांच्या लक्षात आणून दिल्या तर कधीना कधी आपल्याला सत्तेची संधी मिळेल असा विश्‍वास त्याला वाटत असतोच म्हणून असे सत्ताहीन झालेल्या पक्षाचे नेते आपल्या पक्षातला असा आत्मविश्‍वास जागा ठेवण्यासाठी अशी विधाने करीतच असतात.

पण पवारांचा खाक्या वेगळाच आहे. या बाबतीतही त्यांच्या धोरणात दिशाहीनता दिसून येते. आता जे सरकार पडणार असल्याचे भाकीत ते वर्तवत आहेत ते सरकार पडू नये यासाठी काही दिवसांपूर्वी त्यांनी या सरकारला त्याने मागितला नसतानाही पाठींबा जाहीर केला होता. आता त्यांना कोणत्या तारकांनी कसले दर्शन घडवले आहे हे काही कळत नाही पण त्यांना एकदमच हे सरकार पडेल असे संकेत मिळत आहेत ? याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत. आपल्या शेजारी असलेल्या छत्तीसगड, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि गोवा या राज्यात भाजपाची सरकारे आहेत. या सर्व राज्यांतल्या सत्तेच्या खेळात असे दिसून आले आहे की, राज्यातली सत्ता एकदा भाजपाच्या हातात गेली की, ती त्यांच्या हातातून जाता जात नाही. छत्तीसगडमध्ये गेल्या १५ वर्षांपासून भाजपा सरकारने पाय घट्ट रोवले आहेत. गुजरातेत तर गेल्या २५ वर्षात कॉंग्रेसला सत्तेच्या आसपासही जाण्याची संधी मिळालेली नाही. मध्य प्रदेश आणि गोव्यात काही वेगळी स्थिती नाही. महाराष्ट्राच्या सरकारला काल सहा महिने पूर्ण झाले. या निमित्ताने फडणवीस सरकारच्या कारभाराविषयी बहुतेक वृत्तपत्रांनी आपली मते व्यक्त केली आहेत.

महाराष्ट्रातली जनता भ्रष्टाचाराला कंटाळली होती. तिला या बाबतीत फडवणीस सरकारने दिलासा दिला असल्याचा निर्वाळा या वृत्तपत्रांनी दिला आहेे. या सरकारच्या कामकाजात काही ठिकाणी समन्वयाचा अभाव आहे. पण तो किरकोळ आहे पण राजकीय पातळीवर आणि सरकारच्या स्तरावर एकाही भ्रष्टाचाराच्या एकाही प्रकरणाचा साधा आरोपही झालेला नाही. विशेषत: नव्या मुख्यमंत्र्यांनी नव्या शैैलीने प्रशासन चालवून भ्रष्टाचाराची भोके बुजवली असल्या मुळे वृत्तपत्रांनी त्यांची प्रशंसा केली आहे. असेच सुरू राहिले तर महाराष्ट्रात गुजरातची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही भीती पवारांना सतावत असावी. फडणवीस सरकार फार वर्षे टिकणार असे दिसायला लागले तर राष्ट्रवादीच्या उरल्यासुरल्या कार्यकर्त्यांनाही पक्षाच्या भवितव्याविषयी शंका येत राहणार आणि ते पक्षातून बाहेर पडणार. जनतेच्या मनातही अशीच भावना निर्माण झाली तर पक्षाचा जनाधारही जाणार. किंबहुना तसे दिसायलाही लागले आहे. बारामतीच्या परिसरातल्या साखर कारखान्यांच्या निवडणुकांत पवारांच्या विरोधात शब्दही उच्चारण्याची कोणाची हिंमत नव्हती पण आता विरोधी पॅनल उभारले जात आहेत आणि काही वेळा तर पवारांना पराभवाची चव चाखावी लागत आहे. हे सारे विपरीतच आहे. आता आहे ते सरकार टिकणार असा विश्‍वास वाढत गेला तर ही स्थिती वरचेवर ढासळत जाणार आहे. म्हणून अधुन मधुन हे सरकार पडणार असल्याच्या वावड्या उठवाव्या लागतात. पवारांच्या या भविष्यवाणीचे हेच इंगित आहे.

Leave a Comment