जनता परिवार अखेर एक

janta
भारतातल्या समाजवादी नेत्यांच्या दिशाहीन राजकारणात आता एक नवे वाकडे वळण येत आहे. आजवर एकमेकांना पाण्यात पाहणारे समाजवादी आता एकत्र येऊन जनता परिवार साकार करीत आहेत. जनता पार्टी आणि जनता दलाच्या विविध तुकड्यांनी भाजपा आणि कॉंग्रेस यांना आलटून पालटून दोघांनाही संपवत असल्याचा आव आणून राजकारण केले. त्या राजकारणाला काही सूत्रही नव्हते आणि काही दिशाही नव्हती. या दोन पक्षांना संपवत असल्याचे राजकारण ते करीत होते तरीही त्यांच्यासमोर कधीही दुय्यम स्थान स्वीकारीत होते.परिणामी त्यांच्या जोरावर काही राज्यांत कॉंग्रेसचे स्थान काही काळ टिकले तर काही राज्यांत भाजपाने पाय रोवले. हे दोन पक्ष संपण्याऐवजी त्यांना संपवण्याचा पवित्रा घेणारे समाजवादीज संपले आणि आता संपता संपता हातात हात घालून जीवदान मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या राजकारणाची आता गोची होत आहे हे लक्षात यायला लागल्यावर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. तो आधीच घेतला असता तर त्यांची अवस्था एवढी शोचनीय झाली नसती. असो आता तरी शहाणपण सुचले हेही नसे थोडके.

जनता दलाच्या सहा तुकड्यांचे एकत्रीकरण करून समाजवादी जनता पार्टी स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे एकत्रीकरण निव्वळ समाजवाद्यांचेच आहे असे नाही तर जनता दलातल्या गैर समाजवादी नेत्यांचे आणि त्यांच्या पक्षांचेही आहे. कारण मुळात जनता दल हा पक्षच संघटना कॉंग्रेस, भारतीय लोकदल आणि समाजवादी अशा तीन पक्षांचा मिळून झाला होता. खरे तर मुळातला जनता पार्टी नावाचा अधिकृत पक्ष आणि त्याची नांगरधारी शेतकरी ही खूण कोठेच राहिलेली नाही. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी कायदेशीर युक्त्या करून या दोन गोष्टीवर ताबा मिळवला होता. रामकृष्ण हेगडे यांनी या सगळ्या गटांना एकत्र आणून जनता दल नावाची मोट बांधली होती. या जनता दलाने तसे देशातली तिसरी शक्ती म्हणून प्रभावी राजकारण केले होते. या शक्तीने विश्‍वनाथ प्रतापसिंग, चंद्रशेखर, देवेगौडा, आय. के. गुजराल असे अल्पकाळ पदावर राहिलेले का होईना पण चार पंतप्रधान दिले. हे चारही पंतप्रधान कॉंग्रेसमून आलेले होते. पण ते जनता दलप्रणित तिसर्‍या शक्तीने दिलेले होते. कशी का होईना सत्ता मिळाली की सत्तेचा डिंक अशा फुटीर लोकांना बांधून ठेवू शकतो पण या लोकांना तोही पुरला नाही. ते अत्यंत अहंकारी आणि स्वयंकेन्द्रित असल्याने हातातून सत्तेची सूत्रे असतानाच त्यांच्यात पुन्हा फूट पडली. ही फूट लालूप्रसाद यादव यांच्यापासून सुरू झाली होती.

केन्द्रात गुजराल सरकार असताना लालूंच्या चारा घोटाळ्यात आरोपपत्र ठेवले गेले. त्यावर लालू काही राजीनामा देईनात म्हणून त्यांना काढून टाकण्याचा निर्णय पक्षाने घेतला. त्यावर लालूंनी पहिली फूट पाडली. तेच लालूप्रसाद आता जनता परिवाराच्या ऐक्याची घोषणा करीत आहेत. १९९८ साली जनता दलाच्या बहुसंख्य गटांनी भाजपाला पाठींबा दिला आणि वाजपेयी सरकार उभे करण्यास मदत केली. त्यात नितीशकुमार होते, रामविलास पासवान होते, हेगडे होते, पटनाईक, चौताला, अजितसिंग हेही होते. पुढे यातल्या ज्या गटांना आपल्या राज्यांत भाजपाच्या साथीने सत्ता मिळवता येत होती. त्यांनी भाजपाशी मैत्री कायम ठेवली. नंतर काही निमित्ते करून त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. भाजपाला राष्ट्रीय राजकारणात एकटे पाडण्यासाठी नितीशकुमार, नवीन पटनाईक यांनी ही खेळी केली. पण त्यांच्या अपेक्षेनुसार भारतीय जनता पार्टी एकटी पडली नाही. उलट तिला केन्द्रात सत्ता मिळाली. भाजपाला सोडताना यातल्या लालू, नितीशकुमार अशा नेत्यांनी कॉंग्रेसशी युती करण्याचे सकेत दिले होते. पण त्यांच्या कल्पनेप्रमाणे घडले नाही. आता भाजपाची साथ मिळत नाही आणि कॉंग्रेसशी हातमिळवणी करावी तर कॉंगस पक्ष उबदारी येत नाही अशी या सगळ्या प्रादेशिक तुकड्यांची गोची झाली आहे.

या प्रत्येकाने आजवर आपापल्या परीने राजकारण केले होते. ते राजकारण भाजपाशी चुंबाचुंबी करून आपले स्थान पक्के करण्याचे असो की भाजपावर आगपाखड करून कॉंग्रेसशी जवळीक साधण्याचे असो. सर्वांनी आपल्या राज्यातल्या राजकीय समीकरणांना समोर ठेवून वेळोवेळी निराळी समीकरणे दृढ केली होती. पण आता सर्वांचीच सारखी गोची झाली आहे. कारण भाजपा सगळ्याच राज्यात मुसंडी मारत आहे आणि कॉंग्रेस पक्ष अखिल भारतीय विकलांग पक्ष झाला आहे. त्यामुळे कधी भाजपा तर कधी कॉंग्रेस हा त्यांचा ऑँखमिचौलीचा खेळ संपला आहे. म्हणून आजवर परस्परांना कधी दाद न देणार्‍या या माजी जनता नेत्यांनी राजकीय कोंडीतून मान सोडवून घेण्याच्या उद्देशाने समदु:खी उपेक्षितांची आघाडी स्थापन केली आहे. यातला प्रत्येक नेता आपल्या एका राज्यात शेर असल्याने त्यांची संघटित ताकद अशी काही उभारली जाण्याची शक्यता नाही. केवळ बिहारात ती तशी दिसू शकेल, या सर्वांनी थोडे परिपक्वपणाने वागायचे ठरवले तर ही शक्ती देशातली दखलपात्र शक्ती होईल. ही सुरूवात आहे. भाजपा आणि कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष नको असलेला एक मोठा मतदाता वर्ग या देशात आहे. त्याला या जनता परिवाराचा आधार वाटतो.

Leave a Comment