शिक्षण कशासाठी ?

arrest
पुण्यातल्या चौघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना काल पुण्याच्या परिसरात एक निर्जन ठिकाणी वाटमारी करताना अटक करण्यात आली. हे चारही विद्यार्थी पुण्यातल्या एका महाविद्यालयात फार्मसीच्या अभ्यासक्रमाला शिक्षण घेत होते. पण चैन करण्यासाठी पैसे हवेत म्हणून त्यांनी वाटमारी करण्याचा मार्ग चोखाळला होता. ते रात्री बेरात्री एकटे जाणारांना अडवून त्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उक़ळत असत. एखाद्या सावजाकडून अपेक्षित तेवढे पैसे मिळाले नाहीत की ते त्याचे वाहन जाळून टाकत असत. साधारण वीस बावीस वर्षांचे हे तरुण या कामासाठी स्वत:ची वाहनेही वापरत असत. त्यांनी एका वाहन धारकाला अडवले आणि त्याला धमकवायला सुरूवात केली तेव्हा त्याने धोका ओळखून पळणे पसंत केले आणि त्याने थेट पोलीस ठाणे गाठले. आपल्या परिसरात असा प्रकार घडत आहे हे पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्याच ठिकाणी सापळा रचला आणि या चौघांना अटक केली. त्यांनी गुन्हा कबूल केला असून आपण चैनीसाठी पैसे हवे असल्यामुळे या मार्गाला लागलो असल्याचे मान्य केले.

विद्यार्थी या मार्गाला लागत असतील तर ती आपल्या शिक्षण व्यवस्थेसाठी चिंतेची बाब ठरणार आहे. कारण शिकलेला माणूस विचारी असतो असा आपला समज आहे. विचारी माणूस दुसर्‍याचे पैसे लुटणे कधीही पसंत करणार नाही. अनेक सुशिक्षित लोक लांच खाण्याच्या रूपाने जादा पैसा कमावण्याच्या मागे लागले आहेत ही गोष्ट खरी पण या मुलांनी सार्‍या सीमा ओलांडल्या आणि सरळ सरळ रस्त्यावर उभे राहून हिंसेचा वापर करून वाटमारी सुरू केली. आपल्याला ही मुले सुशिक्षित मुले हा अपराध करतात याचे सखेद आश्‍चर्य वाटेल पण वास्तवात आपल्या शिक्षण व्यवस्थेने मुलांवर सुसंस्कार करण्याची जबाबदारी मागेच टाकून दिली आहे. शिक्षण हे संस्कारासाठी आणि देशाचे चांगले नागरिक घडवण्यासाठी असते ही आता कपोल कल्पित कथा झाली आहे. एखादा शिक्षक तसा काही अट्टाहास करायलाच लागला तर त्याचे सहकारी शिक्षक त्याला तसे करू देतीलच याची काही शाश्‍वती नाही. शिक्षण हे चांगली नोकरी मिळवण्यासाठी असते असे आता आपण समजून चाललो आहोत. म्हणूनच लोक आपल्या मुलांना चांगली नोकरी मिळवून देणार्‍या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा यासाठी वाट्टेल ते करायला तयार झाले आहेत. बहुतेक पालक आपल्या मुलाला अभियांत्रिकीला प्रवेश मिळावा यासाठी जीव टाकत असतात. या महाविद्यालयात मुलावर वेगळे चांगले संस्कार होतात म्हणून ही धडपड नसते.

इंजिनियर झाल्यावर चांगला पैसा देणारी नोकरी मिळतेच पण नशीब असल्यास वरचा पैसा मिळण्याचीही शक्यता असते. शक्यतो आपल्या मुलाला अशीच नोकरी मिळवून देणारे शिक्षण मिळाले तर फारच बरे अशी त्यांची धारणा असते. वरचा पैसा मिळणे किंवा मिळवणे हे अनुचित आहे असे पालकच मानत नाहीत. उलट आपल्या मुलाला वरचा पैसा चांगला मिळतो याचा त्यांना अभिमान वाटतो. उपवर मुलींच्या पालकांनाही आपला जावई वरची कमायी चांगली करतो याचा आनंद वाटतो. अशा वरकमाईचचा जावई मिळाला तर त्यांना आपली मुलगी चांगल्या घरात पडलीय असे वाटते. एखादा मुलगा अशी वरकमाई करतो म्हणून त्याला आपली मुलगी देणार नाही असे म्हणणारे पालकही आता दिसत नाहीत आणि असल्या मुलाशी विवाह करणार नाही अशी प्रतिज्ञा करणारी मुलगीही सापडत नाही. आपल्या समाजाने आता वरकमाईला प्रतिष्ठा बहाल केली आहे. अशा समाजात मुले वाटमारीला पाप मानतील अशी शक्यता कमी आहे. म्हणूनच ही मुले जादा पैसा मिळवण्याच्या या मार्गाकडे सहजच वळली आहेत. खरे तर मुलांना खर्चच काय असतो ? वाटमारी करून मिळवावा एवढा पैसा त्यांना लागतोच कशाला?

आता आता असे प्रश्‍नही विचारले जात नाहीत. मुलांना खर्च असतात आणि त्यांच्या गरजा काही हजारातही भागत नाहीत. तसे न भागण्यात काही चूक नाही असेच समाजाचे मत आहे. किंबहुना काही पालकांचा त्यांना पाठींबाही असतो आणि ते आपल्या दिवट्यांना असे हजारो रुपये देतही असतात. आपला मुलगा अशा पैशातून काय करतो याची ते चिंता करत नाहीत. काही मुलांना या पैशातून आणि या पैशामुळे वाईट व्यसने लागतात. काही पालक याचा विचार करीत नाहीत आणि त्यांना असे व्यसन लागल्याचे कळते तेव्हा त्यांना धक्का बसतो. काही पालक तर आपल्या मुलाचे व्यसन गृहितच धरीत असतात. आपल्या चिरंजीवांना आता दारुचे व्यसन लागले आहे याची त्यांना चिंताच वाटत नाही. मुलगा म्हटला की असे एखादे व्यसन लागणारच असे ते मानून चालत असतात. मात्र तरुण वयात संयम रहात नाही. आपल्या व्यसनाची मर्यादा ओलांडली जात आहे याचे भान मुलांना रहात नाही. काही पालक आपल्या मुलांच्या व्यसनांच्या काही कल्पना करतात पण मुले त्यांच्याही पुढे गेलेली असतात. त्याच्या व्यसनांना लाखो रुपये लागू शकतात. त्यांची चटक लागली की त्यांना पालकांकडून मिळणारे पैसे कमी पडायला लागतात. आपण कितीही कष्ट केले तरीही आपल्याला एवढा पैसा मिळणार नाही हे त्यांच्या लक्षात येते आणि नकळतपणे ते पैसा कमावण्याच्या अशा मार्गाला लागतात.

Leave a Comment