दिल्लीत आला आप कोला

cola
दिल्ली- प्रचंड बहुमताने दिल्लीचे सिंहासन हस्तगत केलेल्या आम आदमी पक्षाची म्हणजे आपची लोकप्रियता कॅश करण्यासाठी आप कोला दिल्लीत हजर झाला आहे. आम आदमी साठीचे कोल्डड्रिंक अशी जाहीरात असलेल्या या कोलाची टॅगलाईन प्या आणि तुमच्या हक्कासाठी लढा अशीच आहे.

प्रिन्स बेव्हरीजने हा कोला बाजारात आणला असून तो चार स्वादात आहे. लेमन, कोला, ऑरेंज आणि सरप्राईज असे चार स्वाद असलेल्या या कोलाच्या ४०० ग्रॅम बाटलीची किंमत सर्वसामान्यांना सहज परवडणारी म्हणजे १५ रूपये इतकी आहे. कंपनीचे मालक जितेंद्र केसवानी सांगतात, केजरीवाल यांच्या शपथविधीच्या वेळी रामलिला मैदानावर आमचे सर्व कुटुंब या कोलाच्या २० हजार बाटल्यांसह उपस्थित होते आणि आम्ही जमलेल्यांना हा कोला मोफत वाटला.

केसवानी सांगतात, अण्णा हजारेंच्या रामलिलावरील आंदोलनापासून आम्ही केजरीवाल यांच्याशी जोडलेलो आहोत. आता आमचे सरकार सत्तेवर आले आहे. परदेशी कंपन्याची शीतपेये घेण्यासाठी ३५ ते ४० रूपये मोजावे लागतात. त्याऐवजी आम्ही १५ रूपयांत आमचा कोला सर्वसामान्य नागरिकांनाही सहज परवडेल असा विकण्याचा निर्णय घेतला आहे. आप कोला हे नाव रजिस्टर करण्यासाठी अर्ज केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

केसवानी यांच्या व्यवसायाची सुरवात दक्षिण दिल्लीत १९६० साली पान शॉपने झाली. त्यानंतर त्यांनी व्यवसाय वाढल्यावर ब्रेव्हरीज उद्योग सुरू केला. त्यांचा प्रिन्स कोला आजही दिल्लीत खूपच लोकप्रिय आहे. आता त्याच्या जोडीला आप कोलाही बाजारात आणला गेला आहे.

Leave a Comment