अभूतपूर्व सायबर दरोड्यात १०० कोटी डॉलर्सची चोरी

cyber
जगातील ३० देशांमधील १०० हून अधिक बँकांतून आणि वित्तीय संस्थांमधून सायबर दरोडेखोरांनी सुमारे १०० कोटी डॉलर्स लुटले असल्याचा प्रकार रशियन संगणक सुरक्षा कंपनी कास्परस्कीने इंटरपोल आणि युरोपोलच्या सहाय्याने उघडकीस आणला असल्याचे बीबीसीने म्हटले आहे. विशेष म्हणजे हा प्रकार २०१३ पासून सुरू असावा असे आढळून आले आहे.युक्रेनची राजधानी किव येथील एका एटीएममधून आपोआप पैसे बाहेर येत असल्याचे नुकतेच लक्षात आले तेव्हा केलेल्या तपासात हा दरोडा उघडकीस आला असल्याचे समजते.

हा दरोडा घालणार्‍या सायबर दरोडेखोरांत रशिया, युक्रेन तसेच चीनमधील सायबर गुन्हेगारांची क्रिमिनल गँग जबाबदार असावी असा प्राथमिक तपासाचा अंदाज आहे.रशिया, अमेरिका, जर्मनी, चीन, युक्रेन, कॅनडा देशांसह ३० विविध देशातील रक्कम यात लंपास करण्यात आली असून गुन्हेगारांनी ग्राहकांना नव्हे तर बँकांनाच आपला निशाणा बनविले आहे. इंटरपोल डिजिटल क्राईम सेंटरचे संचालक संजय विरमानी म्हणाले की या प्रकारामुळे सायबर गुन्हेगार कोणतीही संवेदनशील संगणक सिस्टीम सहज भेदू शकतात हेच सिद्ध झाले आहे. या दरोड्यात ग्राहकाऐवजी बँकानाच टार्गेट करण्याची नवी पद्धत वापरली गेली आहे.

हॅकरनी दीर्घकाळ बँकीग प्रणालीत वापरता येईल असे सॉफ्टवेअरच भेदले असावे असाही अंदाज असून येथे कांही बँकातील पैसे ट्रान्स्फर करण्यातही त्यांना यश आले आहे. पुढील तपास सुरू असल्याचे इंटरपोल आणि यूरोपोलकडून स्पष्ट केले गेले आहे.

Leave a Comment