अमेरिकेमधील आण्विक शास्त्रज्ञास कारावासाची शिक्षा

america
वॉशिंग्टन : अमेरिकेमधील एका आण्विक शास्त्रज्ञास अण्वस्त्रासंदर्भातील संवेदनशील माहिती देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली. पेड्रो लिओनार्डो मशेरोनी (वय ७९) असे या शास्त्रज्ञाचे नाव असून व्हेनेझुएला या देशास आण्विक तंत्रज्ञान देण्याचा प्रयत्न करताना ते पकडले गेले होते.

मशेरोनी यांच्या कल्पनेप्रमाणे व्हेनेझुएलाचा अधिकारी असलेला इसम प्रत्यक्षात अमेरिकेमधील तपास संस्था असलेल्या एफबीआयचाच एजंट होता. यानंतर मशेरोनी यांना तत्काळ अटक करण्यात आली होती. मशेरोनी हे मूळचे अर्जेंटिनाचे आहेत. त्यांच्या पत्नीसही एक वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर मशेरोनी हे एक वर्षभर तपासासाठी तपास यंत्रणांच्या ताब्यात होते. यानंतर त्यांना शिक्षा सुनाविण्यात आली. मशेरोनी यांचा कॉंप्युटर, पुस्तके, पत्रे व छायाचित्रे एफबीआयने ताब्यात घेतली आहेत. मशेरोनी एफबीआयच्या गुप्त एजंटला आपण व्हेनेझुएलास सुमारे दशकभराच्या काळामध्ये अणुबॉंब तयार करण्यासाठी मदत करु शकतो, असे सांगितले होते. व्हेनेझुएलामध्ये गुप्त आण्विक भट्टी तयार करता येईल, असे आश्वासनही मशेरोनी यांनी, ते व्हेनेझुएलाचा अधिकारी समजत असलेल्या या एजंटला दिले होते. मशेरोनी हे अमेरिकेतील प्रसिद्ध लॉस अलामोस प्रयोगशाळेमध्ये सुमारे दहा वर्षे अण्वस्त्र संरचना भागामध्ये कार्यरत होते. याच प्रयोगशाळेमध्ये जगामधील पहिला अणुबॉंब तयार करण्यात आला होता.