ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अक्षर पटेलला संधी

axer-patek
मुंबई – अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतून माघार घेतल्याने त्याच्या जागी अक्षर पटेलची संघात निवड करण्यात आली आहे. एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय पटेल यांनी कळविली.

रवींद्र जाडेजाच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे तो उपचारासाठी भारतात परत येणार असून त्याच्या जागी कसोटी मालिकेतील उर्वरीत सामन्यांसाठी अक्षर पटेलची संघात निवड करण्यात आली आहे असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

उर्वरीत दोन कसोटी सामन्यांसाठी संघात हा बदल करण्यात आला आहे. अक्षर पटेल सध्या रणजी स्पर्धेत खेळत असून या स्पर्धेत त्याने आतापर्यंत उत्तम कामगिरी केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळविला जाणार आहे. आता अक्षरच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment