
बगदाद – इस्लामिक स्टेट फॉर इराक ऍण्ड सीरिया अर्थात इसिसचा आणखी एक क्रूर चेहरा जगासमोर आला असून संघटनेच्या म्होरक्यांनी गैरमुस्लिम महिलांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासह बालकांना गुलाम म्हणून ठेवण्यासही योग्य ठरविले आहे.
इसिसचा आणखी एक क्रूर चेहरा जगासमोर
इसिसच्या दहशतवाद्यांनी ‘महिला गुलामांवर प्रश्नोत्तरे आणि त्यांचे स्वातंत्र्य’ या मथळ्याच्या एका पत्रकातून आपल्या घृणास्पद विचारांचा प्रसार केला आहे. सध्या दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या मोसूल शहरात प्रार्थनेनंतर ही पत्रके वाटण्यात आली आहेत. पत्रकानुसार, इसिसच्या दहशवाद्यांनी अल्पवयीन मुलींवर दया दाखविण्याची मुळीच गरज नसल्याचे म्हटले आहे. गैरमुस्लिम महिला आणि बालकांची खरेदीविक्री करणे आणि त्यांना भेटीदाखल दुसर्यांना देण्यात काहीच गैर नसल्याचेही पत्रकात सांगण्यात आले आहे.
एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, इसिसचे दहशतवादी गैरमुस्लिम महिलांचे अपहरण करतात, मग बलात्कार करून त्यांना विकतात. केवळ महिलाच नव्हे तर निष्पाप बालकांवरही त्यांनी क्रूरता चालविली आहे. ‘शरिया’ कायदा न मानणार्या लोकांचे शिर धडावेगळे करण्याचे आदेशही या पत्रकातून देण्यात आले आहेत. हे सर्व कृत्य पवित्र कुराणाचा कथित संदर्भ देत ‘अल्लाह’ला मान्य असल्याचे दहशतवाद्यांनी म्हटले आहे.
